तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी हा स्फोट एक हल्ला असल्याचे म्हटले आणि दोषींना शिक्षा केली जाईल असे सांगितले. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटानंतर इस्तिकलाल स्ट्रीटच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. रुग्णवाहिकांनी जखमींना येथून बाहेर काढले आहे. परिसराच्या सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरही घिरट्या घालत होते. या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले.
२०१६ मध्येही झाला होता स्फोट
या प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सेमल डेनिजसी यांनी सांगितले की, जेव्हा मी हा स्फोटाचा आवाज ऐकला तेव्हा मी ५० मीटर दूर होतो. एएफपीनुसार ने दिलेल्या वृत्तात ते म्हणतात, ‘मी तीन ते चार लोक जमिनीवर पडलेले पाहिले. लोकांमध्ये घबराट पसरली होती आणि ते धावत होते. स्फोटानंतर सर्वत्र काळा धूर पसरला. आवाज इतका मोठा होता की थोडा वेळ मला काहीच ऐकू आले नाही. ज्या भागात स्फोट झाला तो परिसर दुकानदारांनी फुलून गेला आहे. २०१६ मध्ये एका आत्मघातकी हल्ल्यातही याला लक्ष्य करण्यात आले होते.
संशयितांचा शोध घेणे सुरू
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांनुसार, या हल्ल्यात तीन जण संशयित आहेत. यातील मुख्य संशयित महिला आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनीही याला दुजोरा दिला आहे. तिचा कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीशी संबंध असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने स्फोटकांनी भरलेली बॅग वाटेत सोडली. त्यानंतर काही मिनिटांतच हा स्फोट झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात दोन पुरुषांचाही सहभाग आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून मिळणार माहिती
सुरक्षा विश्लेषक मुरत अस्लान म्हणाले, ‘ज्या भागात हल्ला झाला तो भाग गजबजलेला आहे. येथे अत्यंत काळजी घेतली जाते. या भागात पोलीस सतर्क आहेत. या भागात तुमच्या हातात एखादी बॅग संशयास्पद वाटल्यास पोलिस तुम्हाला रोखू शकतात. पण तुम्ही सरळ बघितले तर तुम्हाला कोणी अडवणार नाही. कारण हे सार्वजनिक ठिकाण असून पोलीस सर्वांना थांबवत नाहीत. हा परिसर सुरक्षा कॅमेऱ्यांनी भरलेला आहे. मला वाटते त्यांच्या माध्यमातून काही धागेदोरे सापडतील.’