jitendra awad, मोठी बातमी : दुसरा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडून थेट आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा – the second case was filed jitendra awhad announced his resignation as an mla
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.
‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाईही करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना नुकताच जामीन मिळाला असतानाच आता आणखी एका प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.