आव्हाड यांच्या ट्विटचा संबंध शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी जोडला जात आहे. व्हिव्हियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. सर्व नियमांचे उल्लंघन करून आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने अटक झाल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. तसेच आव्हाड यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला होता. मी पोलिसांच्या ताब्यात असताना अधिकाऱ्यांना सतत एका चाणक्याचे फोन येत होते. या चाणक्याकडून जितेंद्र आव्हाड यांना पोलीस कोठडीत जेवणही मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे हा चाणक्य कोण, याची उत्सुकता सर्वांनी लागली होती.
अखेर काही तासांनंतर हा चाणक्य म्हणजे नरेश म्हस्के असल्याची माहिती समोर आली होती. यावरुन नरेश म्हस्के यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. आव्हाडांनी उल्लेख केलेला चाणक्य आपणच आहोत, असा त्यांचा माझ्यावर रोख असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण चाणक्य हा राजकारणातला चांगला माणूस होता, असे म्हस्के यांनी म्हटले. त्यामुळे म्हस्के यांनी पोलिसांना फोन करणारा ‘चाणक्य’ आपणच असल्याची अप्रत्यक्ष कबुली देऊन टाकल्याचे म्हटले जाते.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला. चाणक्य नाही शकुनि मामा … शिंदे साहेब जपून रहा. नरेश म्हस्के हा चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद आहे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, नरेश म्हस्के आमदार नाहीत, ते मंत्रिमंडळात कधी आले नाहीत, विधानसभेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. विधानपरिषदेचं सदस्यत्व देणार म्हणून त्यांना केवळ चॉकलेट दाखवण्यात आलं आहे. असं असूनही हा माणूस टीव्हीवर उघडपणे म्हणतो, ‘आता बघा जितेंद्र आव्हाड किती दिवस तुरुंगात बसतात’, ते असं विधान कसं करू शकतात, याची स्पष्टता मला सरकारकडून हवी आहे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.