धर्मवीर चित्रपटावरूनही ‘सामना’तून टीकास्त्र
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरूनही सामनात टीका करण्यात आली आहे. ‘हर हर महादेव नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर केली गेली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला. असे अनेक प्रसंग चित्रपटात असून ते इतिहासाशी विसंगत आहेत. ‘पावनखिंड’ नामक एक चित्रपट मधल्या काळात आला व गेला. त्यावरही आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे पडद्यावर तसेच रंगमंचावर ऐतिहासिक नाटय़ आणणाऱ्यांसमोर मोठाच यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही. राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड गल्लाभरू चित्रपटांसाठी केली जाऊ नये,’ अशी अपेक्षा ‘सामना’तून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावं लागेल.