– अनंत साळी

जालना: इतिहासाच्या काळापासून महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची आणि धैर्याची परंपरा आहे. वीर बापू गायधनी यांचा धडा वर्गात शिकवला जातो. पण जागोजागी खेडोपाडी वाड्या वस्त्यावर असे अनेक वीर बापू गायधनी आहेत, जे जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यात तत्पर आहेत. जालन्याच्या सावन बारवाल या अवघ्या ११ वर्षांच्या मुलानं शेतातील विहिरीत बुडत असलेल्या १० वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झाले.

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील लालवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेला सावन रामदास बारवाल लालवाडी गावात वास्तव्यास आहे. २९ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याच शेतातील विहिरीत बुडणाऱ्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षांच्या गौरी भिमसिंग बारवालचे मारुन प्राण वाचवले.

सावन बारवाल २९ सप्टेंबरला सायंकाळी घरी अभ्यास करत होता. त्याची बहीण भाग्यश्री पाणी आणण्यासाठी बाजूच्या विहिरीवर गेली होती.३५ फूट खोल व खडकाळ असलेल्या विहिरीत भरपूर पाणी होते. तिथून पाणी आणण्यासाठी म्हणून तिच्या सोबत शेजारची गौरी भिमसिंग बारवाल ही पण विहिरीकडे पाणी भरण्यासाठी गेली. पाणी भरताना गौरीचा तोल गेला आणि ती अचानक विहिरीत पडली.
यांची बातच न्यारी! १५० फुटांवर पत्ते फेकणारा भाऊ गिनीज बुकात; बहिण पारंपारिक खेळात हुश्शार
गौरी पाण्यात पडताच भाग्यश्रीने जोराने आरडाओरडा सुरू केला व घरी येऊन आपला भाऊ सावन याला ही घटना सांगितली. ते ऐकताच अभ्यास करत बसलेल्या सावनने कोणताही विचार न करता थेट विहीर गाठून आतमध्ये उडी घेतली. गौरीच्या ड्रेसला पकडून विहिरीतील पाईप आणि मोटारीला धरून गौरीला विहिरीच्या कडेला आणले. तोपर्यंत ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली.गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत विहिरीच्या कडेला असलेल्या गौरी आणि सावन बारवाल याला विहिरी बाहेर काढले.

सावनच्या धाडसामुळे गौरीचे प्राण वाचले. त्यामुळे गावकऱ्यांनी सावनवर कौतुकाचा वर्षाव केला. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गौरीचे प्राण वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या सावन आणि त्याच्या पालकांचा लालवाडी ग्रामस्थांनी जोरदार सत्कार करून त्याला शाबासकी दिली. यावेळी बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, शिक्षण विस्ताराधिकारी क्षीरसागर, केंद्रप्रमुख तथा दाभाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी देशमुख, सरपंच सुनील घोरपडे, मुख्याध्यापिका एम. यू. पाटोळे, सहशिक्षिका डी. एम. जोंधळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Pune : शेतकऱ्याच्या मुलीची अनोखी कला, वैष्णवी तरंगते पाण्यावर! पाहणारे होतात अवाक
बुडणाऱ्याला वाचवणे हे वाटते तितके सोपे नसते. अशा परिस्थितीत अनेकदा बुडणाऱ्याला वाचवण्यास गेलेल्या व्यक्तीचा जीव संकटात सापडतो. पण सावनने प्रसंगावधान राखले. त्याने मोठ्या धाडसाने विहिरीत उडी घेवून चिमुकल्या मुलीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सावन बारवाल याचे साहसी कृत्य आज अनेकांसमोर प्रेरणादायी ठरत आहे.

बदनापूर तहसीलचे तहसीलदार मुंडलोड यांनी सावनला तहसीलमध्ये बोलावून त्याचा सत्कार केला. बदनापूरच्या गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड यांना ही घटना कळताच त्यांनी सावन व त्याच्या आई-वडिलांचा कार्यालयात बोलावून सत्कार केला. त्याला एक पुस्तक व रोख रक्कम भेट म्हणून दिली.
सावनच्या धाडसाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी(प्राथमिक) कैलास दातखिळ व उपशिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी त्याच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तत्परतेनं पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here