पुणे: जिद्द, चिकाटी, परिश्रम, आत्मविश्वास हे शब्द तसे खूप मोठे आहेत. याचा अर्थ समजण्यासाठी भल्या भल्यांचं आयुष्य सरते. तर काहींना आपल्या कृतीतूनच या शब्दांची ओळख होते आणि ज्यांना याची ओळख होते असे ध्येयवेडे इतिहास घडवतात. आजची गोष्ट आहे अशाच एका पराक्रमी मुलाची ज्याचं वय आहे अवघे आठ वर्षे. पण आठ वर्षातच या मुलाने जग जिंकण्याचं काम करून दाखवलंय.

संस्कार ऋषिकेश खटावकर असे या जग जिंकणाऱ्या बालकाचे नाव आहे. अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम संस्कार खटावकर याने केला आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न प्रायमरी स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या संस्कारने नुकतीच ही विक्रमी कामगिरी केली आहे. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन यामध्ये घेण्यात आली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र ३ मिनिटे आणि ७ सेकंदांत पठण करत त्याने केरळच्या मुलीचा तीन मिनिटे आणि ४४ सेकंदाचा विक्रम मोडला आहे.

ज्या वयात अक्षर ओळखदेखील नीट झालेली नसते, त्या वयात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र यांसारखे कठीण उच्चार संस्कार अगदी सहज शिकला. कोरोना काळात रिकाम्या वेळेत संस्काराचे वडील ऋषीकेश खटावकर आणि आई मोनिका खटावकर यांनी संस्कार कडून कसून सराव करून घेतला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. संस्कार एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहे.
यांची बातच न्यारी! १५० फुटांवर पत्ते फेकणारा भाऊ गिनीज बुकात; बहिण पारंपारिक खेळात हुश्शार
इतक्या कमी वयात संस्कार जितके स्पष्ट उच्चार करतो, त्याचे विचार आणि दृष्टीदेखील तितकीच स्पष्ट आहे. माझे आई बाबा सांगतात अवघड काहीच नाही सगळं सोपं आहे आणि त्याचमुळे मी हा विश्वविक्रम करू शकलो, असे संस्कार अगदी आत्मविश्वासाने सांगतो. कोरोना काळामध्ये रिकाम्या वेळात माझ्या वडिलांनी गुगलवर शिवतांडव स्तोत्र सर्च केलं. मात्र त्यांना त्याचे उच्चार जमत नव्हते. त्यांनी मला सांगितलं संस्कार तुला हे शिकायचं आहे. त्यानंतर मी सराव सुरू केला आणि माझ्या आई वडिलांनी माझ्याकडून तो सराव करून घेत मला इथवर आणले आहे. याचा सराव मात्र मी माझ्या मूडवर करत होतो. कधी दोन तास, कधी पंधरा मिनिटे, तर कधी अर्धा तास असा हा सराव चालायचा. सुरुवातीला मला हे खूप अवघड वाटलं. मात्र, माझ्या बाबांनी मला सांगितलं की अवघड काहीच नसतं आणि त्यानंतर हे सगळं कसं झालं हे मलादेखील कळलं नाही, अशा शब्दांत संस्कारने त्याचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला.
Pune : शेतकऱ्याच्या मुलीची अनोखी कला, वैष्णवी तरंगते पाण्यावर! पाहणारे होतात अवाक
संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर आणि आई मोनिका खटावकर हे दोघेही बी.टेक झालेले आहेत. कोरोना काळात मुले हे मोबाईलच्या आहारी गेल्याची अनेक उदाहरणे समोर होती. मात्र आपल्या मुलांनी हा वेळ सत्कारणी लावावा असं त्यांना वाटले आणि त्यातूनच ऋषिकेश खटावकर यांनी संस्कार कडून याचा सराव करून घेण्यास सुरुवात केली. हे स्तोत्र पाठांतराला सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली. म्हणजे त्यावेळी संस्कारच वय केवळ पाच वर्ष होते. त्यावेळेस त्याचा कम्फर्ट झोन ओळखून करून त्याच्याकडून हे सगळं पाठांतर करून घेणे हे मोठे आव्हान होते. मात्र सुरुवातीला त्याचा रिस्पॉन्स हा अतिशय चांगला होता. हे दिसल्यानंतर शिवतांडव स्तोत्राचे एक छंद पूर्ण करायला सुरुवातीला पंधरा दिवस आम्हाला लागत होते. त्यानंतर संस्कार आठ दिवसात एक एक छंद पूर्ण करू लागला अशा पद्धतीने संपूर्ण शिवतांडव स्तोत्र त्याने पाठ केले. मात्र संस्कारवर आम्ही जबरदस्ती कधीच केली नाही. त्याच्या वेळेनुसार आणि मर्जीनुसार हे करत गेलो आणि हा विश्वविक्रम साध्य झाला, असे ऋषिकेश खटावकर सांगतात.
शेजारची गौरी बुडतेय! शब्द कानावर पडताच ११ वर्षीय सावनची खडकाळ विहिरीत उडी; जीवाची बाजी लावली
संस्कारलाही विश्वविक्रमी कामगिरी करण्यासाठी सर्वात जास्त मदत झाली ती त्याची आई मोनिका खटावकर यांची. घरातील काम पाहून संस्कार कडून हे पाठांतर करून घेण्याची जबाबदारी मोनिका खटावकर यांच्यावर होती. स्वतः बी टेक असलेल्या मोनिका खटावकर यांना असं कायम वाटायचं की आपला मुलगा हा मोबाईलच्या आहारी जाऊ नये. मात्र संस्कार हा मोबाईलच्या आहारी चालला असं मोनिका यांना दिसले. शिवतांडव स्तोत्र पठणाच्या माध्यमातून त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि हे शक्य झालं असं मोनिका खटावकर सांगतात. हे सगळं करत असताना ज्यावेळेस संस्कारने विश्वविक्रमी कामगिरी केली हे आम्हाला ज्या क्षणी कळलं त्या क्षणी डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते हे सांगताना मोनिका खटावकर काहीशा भावुक होतात. आई-वडिलांच्या नावाने मुलांना ओळखले जाते. पण आता संस्कारच्या नावाने आम्हाला ओळखलं जातं. हे संस्कारचे आई-बाबा असे म्हटले जाते याचा सगळ्यात जास्त आनंद होतो, असे मोनिका खटावकर यांनी अभिमानाने सांगितले.

संस्कारने विश्वविक्रमी कामगिरी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संस्कारच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मंत्रालयात एकनाथ शिंदे यांनी संस्कारचे कौतुक करत त्याचा सत्कार केला आहे. एकीकडे मैदानी खेळ, पुस्तकांचे वाचन, पाठांतर याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र जेव्हा समाजासमोर संस्कार सारखी उदाहरणे येतात तेव्हा या सगळ्या गोष्टींची किंमत आणि महत्त्व आणखीनच वाढतं हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here