१३ दिवसांच्या ट्रेकची सुरुवात नेपाळची राजधानी काठमांडूपासून झाली. १४८ किलोमीटरच्या ट्रेकमधील पहिला टप्पा लुक्ला (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच) आहे. तिथून फाकडिंग (समुद्र सपाटीपासून २६१० मीटर उंच) ते नामचे बाजार (समुद्र सपाटीपासून ३४४० मीटर उंच) ते टिंगबोचे (समुद्र सपाटीपासून ३८६० मीटर उंच) ते डिंगबोचे (समुद्र सपाटीपासून ४११० मीटर उंच) ते लोबुचे (समुद्र सपाटीपासून ४९१० मीटर उंच) ते गोरक्षेप (समुद्र सपाटीपासून ५१४० मीटर उंच) ते कालापथर (समुद्र सपाटीपासून ५५५० मीटर उंच) आणि अखेरीस एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) असं ट्रेकचं स्वरुप होतं.
आम्ही जसजशी वर चढाई करत होतो, तसतसं तापमान घटत होतं. पाच जॅकेट घातलेले असतानाही थंडी वाजत होती. हळूहळू झाडं दिसेनाशी होत गेली. मग फक्त बर्फ आणि बर्फच दिसू लागला, असा अनुभव गृहितानं सांगितला. आम्ही या मोहिमेसाठी बरीच तयारी केली होती. बाबांसोबत मी घरी योगा करायचे. व्यायाम करायचे. कॅम्प सुरू असताना माझ्या दिदीची तब्येत बिघडली. त्यावेळी काय करायचं ते करत नव्हतं. पण बाबांनी सांगितलं आपण पुढे जायचं. मग आम्ही मोहीम सुरूच ठेवली आणि अखेर लक्ष्य गाठलं, अशा शब्दांत गृहितानं तिचा संस्मरणीय अनुभव मटाला सांगितला.
गृहिताला घेऊन तिचे पालक एकदा ट्रेकिंगला गेले होते. तेव्हापासून तिला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. अभ्यास सांभाळून ती ट्रेकिंग करू लागली. गोपाळगड, पन्हाळा, अगोडा या ठिकाणी तिनं ट्रेकिंग केलं. हळूहळू चढाया अवघड होत गेल्या. वडील सचिन विचारे आणि बहिण हरिता विचारे (१४ वर्षे) यांनी गृहिताला मोलाची साथ दिली. गृहिता दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी ट्रेकिंग करू लागली. मात्र तिनं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळुसबाईवर गृहितानं यशस्वी चढाई केली आहे. याशिवाय अलंगगड, मदनगड, कुलंगगड, कर्नाळा किल्ला, सुधागड, रतनगड, हरिहर किल्ल्यांवरील ट्रेक तिनं यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. गेल्याच महिन्यात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणाऱ्या गृहिताला आता माऊंट एव्हरेस्ट शिखर गाठण्याचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यासाठी वाचकांनी मदत करावी असं आवाहन तिनं केलं आहे.