मध्यरात्री जंगलात फेकायचा तुकडे…
तोंडावरून अगदी साधा दिसणारा आफताब असं काही करेल यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्याचं पूर्ण नाव आफताब अमीन पूनावाला आहे. त्याने मृतदेहाचे एक नाही तर दिल्लीत अनेक ठिकाणी तुकडे केले होते. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघरची रहिवासी होती. आफताबने पोलिसांना चकमा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. श्रद्धाच्या मृतदेहापर्यंत पोलीस कधीच पोहोचणार नाहीत आणि तिचे रहस्य कायमचे गुपित राहील याची त्याला खात्री होती.
१८ मे रोजी झालं भांडण आणि…
पोलिसांनी हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा ऐकणाऱ्यांच्याही अंगावर काटा आला. १८ मे रोजी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं तेव्हा आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ठेवण्यासाठी फ्रीज विकत घेतला. पुढील १८ दिवस आफताब मध्यरात्रीनंतर घरातून निघून श्रद्धाच्या शरीराचे अवयव दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत राहिला. त्याने सांगितलं की प्रत्येक २ किमी गेल्यानंतर तो मृतदेहांचे तुकडे जंगलात फेकायचा जेणेकरून ते प्राणी खाऊ शकतील.
मुंबईत प्रेम आणि दिल्ली प्रेयसीचाच गेम…
ही प्रेमकहानी मुंबईतून सुरू झाली. २६ वर्षीय श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. इथेच तिची पूनावालाशी भेट झाली. दोघांनी डेटिंग सुरू केलं आणि जास्त वेळ एकत्र घालवायला सुरुवात केली. त्यांचे नाते घरच्यांनी मान्य केले नाही, त्यामुळे ते कुटुंबीयांना न सांगता दिल्लीला गेले. इकडे मेहरौली परिसरात त्यांनी फ्लॅट घेऊन राहायला सुरुवात केली. काही काळ ठीक होते पण नंतर लग्नावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आफताबने लग्न करावं अशी श्रद्धाची इच्छा होती पण तो तयार नव्हता.
दुसरीकडे, श्रद्धाला तिच्या कुटुंबीयांचे फोन येणं बंद झालं होतं. ८ नोव्हेंबर रोजी तिचे वडील विकास मदन आपल्या मुलीची विचारपूस करण्यासाठी दिल्लीला पोहोचले. ते फ्लॅटवर गेले तेव्हा दरवाजा बंद होता. यामुळे त्यांनी तातडीने मेहरौली पोलिसात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूनावालाला शनिवारी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, श्रद्धाला त्याच्याशी लग्न करायचे असल्याने दोघांमध्ये भांडण सुरू झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून श्रद्धाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.