कोल्हापूर: लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्यात रोज तब्बल ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. यामुळे सध्या राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांचे अर्थकारणच ‘डाऊन’ झाले आहे. अतिरिक्त दूधाचे पावडर करण्याचा निर्णय संघांनी घेतला. अचानक त्याचेही दर आंतरराष्ट्रीय स्तरावर निम्यावर आल्याने राज्यात सध्या पन्नास हजार टन पावडर गोडावूनमध्ये लॉक झाले आहे. संघांची ही अवस्था असतानाच शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने दूग्ध व्यवसायच उकळण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सध्या ३२६ दूधसंघ असून त्यामध्ये १०७ सहकारी व २१९ खासगी आहेत. या संघाकडून रोज जवळजवळ १ कोटी १९ लाख लिटर दूध संकलन होते. लॉकडाऊन नसताना त्यामधील ८६ लाख लिटर पॅकिंगव्दारे विक्री होत होती. लॉकडाऊन काळात ६७ लाख लिटर दूध पॅकिंगव्दारे विक्री होत आहे. हॉटेल, मिठाई व अन्य दूग्धजन्य पदार्थ यासाठी होणारा वापर प्रचंड कमी झाल्याने रोज तब्बल ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. यामुळे या दुधाचे करायचे काय असा प्रश्न संघासमोर आहे. यातील केवळ पाच लाख लिटर दूध राज्य सरकार खरेदी करून त्याची पावडर करत आहे. इतर दुधाचे पावडर करण्याची वेळ संघावर आली आहे.

दोन तीन महिन्यापूर्वी या पावडरचा दर ३२० ते ३३० रूपये होता. पण तो देखील अचानक घसरला. सध्या त्याचा दर १८० ते २०० रूपये झाला आहे. त्याची परदेशात होणारी निर्यात बंद झाली आहे. यामुळे बहूतेक दूधसंघाकडे ही पावडर पडून आहे. हा आकडा किमान पन्नास हजार टनापर्यंत आहे. यातच केंद्राने दहा हजार टन पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने संकटात नवे संकट येणार आहे. बाजारात दर नाही, त्यामुळे त्याची विक्रीच बंद झाल्याने संघांचे कोट्यवधीचे भांडवल अडकून पडले आहे.

या सर्व परिस्थितीत सध्या बहूतेक सर्वच दूध संघाचे अर्थकारण बिघडले आहे. काही संघांनी दूध संकलन बंद करून कुलूप लावले आहे. अनेकांनी दूध खरेदी दर कमी केले. अनेकांकडे दूध उत्पादकांची देणी थकित आहेत. अशा कठीण परिस्थितीत आता शेतकरी संघटनांनी आंदोलनचा इशारा दिला आहे. दुधाचे दर वाढवा, अनुदान द्या, निर्यातीला परवाना द्या अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना आंदोलन करणार आहे. यामुळे दूध आंदोलनाला पुन्हा उकळी फुटणार आहे. हे आंदोलन तीव्र झाले तर मात्र नासण्याची चिन्हे आहेत.

दुधाबाबतची आकडेवारी

>> राज्यातील नियमित दूधसंकलन : १ कोटी १९ लाख लिटर

>> पॅकिंगमधून होणारी दूध विक्री : ८६ लाख लिटर

>> लॉकडाऊन काळातील दूध विक्री : ६७ लाख लिटर

>> रोजचे अतिरिक्त दूध : ५२ लाख लिटर

>> राज्यातील दूध पावडर साठा : ५० हजार टन

>> पावडरचे सध्याचे दर : १८० ते २२० रूपये किलो

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here