मेलबर्न: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत १३७ धावा केल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या धावसंख्येला अंकुश लावला. मात्र तरीही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडला अडचणीत आणलं. मात्र अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं अर्धशतकी खेळी साकारत संघाला जेतेपद पटकावून दिलं.

पाकिस्तानच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीची चर्चा झाली. आफ्रिदीला दुखापत झाली नसती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता असं पाकिस्तानी चाहत्यांपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपासून अनेकांनी सांगितलं. मात्र आफ्रिदीला दुखापत झालेली स्थिती, त्यावेळी असलेली इंग्लंडची स्थिती, त्यांच्याकडे असलेली फलंदाजी पाहता पाकिस्तानच्या दाव्यात फारसा दम नाही.
चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस; भारतही मालामाल, पाहा टीम इंडियाला किती बक्षीस मिळणार?
आफ्रिदीच्या दुखापतीमुळे हरला पाकिस्तान?
कालच्या सामन्यात इंग्लंडसमोर १३८ धावांचं आव्हान होतं. आफ्रिदीनंच हेल्सला बाद करत पाकिस्तानला पहिलं यश मिळवून दिलं. तीन गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ अडचणीत होता. त्यानंतर हॅरी ब्रूकची विकेट पडली. १३ व्या षटकात ब्रूक बाद झाला. शाहीननं त्याला झेलबाद केलं. मात्र झेल घेताना आफ्रिदी जायबंदी झाला. त्याला मैदान सोडावं लागलं. त्याला होत असलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.

काही वेळानं शाहीन मैदानात आला. त्यानं १६ व्या षटकाची सुरुवात केली. मात्र एक चेंडू टाकताच पुन्हा वेदना सुरू झाल्या. तो पुन्हा मैदान सोडून गेला. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, असं आझमनं सांगितलं. त्यावेळी इंग्लंडची अवस्था ४ बाद ९७ होती. त्यांना २९ चेंडूंमध्ये ४१ धावांची गरज होती. मैदानात बेन स्टोक्स आणि मोईन अली होते.
न्यूझीलंडच्या पोरामुळे इंग्लंड चॅम्पियन; वडिलांनी नोकरी बदलली, पोरानं पाकची नौका बुडवली
आफ्रिदी परतल्यावर काय घडलं?
आफ्रिदी केवळ एक चेंडू टाकून पॅव्हेलियनची वाट धरली. सध्याच्या घडीचं टी-२० क्रिकेट पाहता २९ चेंडूंमध्ये ४१ धावा हे आव्हान फारसं मोठं नाही. त्यातही बेन स्टोक्सचा चांगला जम बसला होता. मोईन अलीकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. या दोघांनंतरही इंग्लंडकडे उत्तम फलंदाजी करणारे खेळाडू होते. लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन चांगली फलंदाजी करतात. ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशीदला फटकेबाजी करता येते. त्यामुळे आफ्रिदी मैदानात असता, तरीही इंग्लंडचं पारडं जड होतं.
इंग्लंडकडून पराभव, रोहित रडला; खेळाडू बॅगा भरू लागल्या; मध्यरात्री सर्वांना मेसेज आला अन्…
सुनील गावसकर काय म्हणाले?
आफ्रिदीच्या दुखापतीमुळे सामन्याच्या निकालात फारसा बदल झाला नसता, असं मत टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मांडलं. आफ्रिदीला दुखापत झाली नसती, तरीही फार फरक पडला नसता, कारण पाकिस्तानकडे धावसंख्येचं पुरेसं पाठबळ नव्हतं. पाकिस्ताननं १५०-१५५ धावसंख्या केल्या असता, तर त्यांच्या गोलंदाजांकडे संधी होती. आफ्रिदीनं त्याचा ४ षटकांचा कोटा पूर्ण केला असता, त्यात त्यानं १-२ विकेट घेतल्या असत्या, तरीही इंग्लंडनंच सामना जिंकला असता, असं गावसकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here