गाझियाबाद: चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या इसमाची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी चंद्रवीर उर्फ पप्पूचा मृतदेह घरात खड्डा खणून ताब्यात घेतला.

सिहानी गेट परिसरात वास्तव्यास असलेल्या भुरे सिंह यांनी ५ ऑक्टोबर २०१८ रोजी एफआयआर दाखल केला. ४६ वर्षांचा भाऊ चंद्रवीर २८ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचं भुरे सिंह यांनी तक्रारीत म्हटलं. यानंतर गाझियाबाद पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवत तपास सुरू केला. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

गुन्हे शाखेनं संशयाच्या आधारावर चंद्रवीर यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर दोघांनी हत्येची कबुली दिली. आरोपी अरुण आणि मृताची पत्नी सविता यांचे २०१७ पासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आली.
तुझ्या भावाला ४ वर्षांपूर्वी मीच मारलं, घरात गाडलं! शेजाऱ्याचं ऐकून भावानं खड्डा खणला अन्…
अरुण आणि सविता यांच्या अवैध संबंधांची माहिती मृत पती आणि त्याच्या कुटुंबाला समजली. चंद्रवीर यांनी अनेकदा अरुण आणि सविताला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. यावरून चंद्रवीरनं अनेकदा सविताला मारहाण केली. अवैध संबंध कायम ठेवायचे असल्यास चंद्रवीरला रस्त्यातून हटवायला हवं, हे दोघांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी चंद्रवीरच्या हत्येचा कट रचला.

अरुणनं त्याच्या घरात ६ फुटांचा खड्डा खणला. २८ सप्टेंबर २०१८ रोजी चंद्रवीर दारु पिऊन घरी आला. त्यानंतर सवितानं अरुणला घरी बोलावलं. अरुणनं पिस्तुलातून चंद्रवीरच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर आरोपींनी चंद्रवीरच्या डोक्याखाली एक बादली ठेवली. चंद्रवीरच्या डोक्यातून पडणारं रक्त बादलीत जमा झालं. रक्त सांडणं थांबल्यावर अरुणनं चंद्रवीरचा मृतदेह सविताच्या मदतीनं त्याच्याच घरात खणलेल्या खड्ड्यात गाडला.
शाब्बास मुंबई पोलीस! ९७ सिम, १६७ CCTV तपासले; पोस्टमन, फळवाले बनले; मिशन अलीबाबा यशस्वी
चंद्रवीर उजव्या हातात स्टिलचा कडा घालायचा. तो काढण्याचा प्रयत्न अरुणनं केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यामुळे अरुणनं कुऱ्हाडीनं त्याचं मनगट कापलं. आरोपींनी चंद्रवीरचा हात सिकरोड गावाजवळच्या केमिकल कारखान्याजवळ एका गोणीत भरुन टाकला. कुऱ्हाड आणि पिस्तुल सविताच्या घरात विटेखाली लपवलं. काही दिवसांनी तिथे फरशी टाकून घेतली. यानंतर सवितानं पती बेपत्ता झाल्याचं म्हणत त्याचा आरोप भाऊ भुरावर केला.

कोणीही संशय घेऊ नये म्हणून सविता दररोज गावातील सन्मानयीय व्यक्तींकडे जायची. त्यांच्याकडे स्वत:चं गाऱ्हाणं मांडायची. पोलिसांना सवितावर संशय आला. त्यांनी तिची कसून चौकशी केली आणि गुन्हा उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here