ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे शहरात सुरू झालेला राजकीय संघर्ष अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. ठाण्यातील किसन नगर परिसरात काल रात्री ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. सदर कार्यकर्ता मारहाणीत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर पोलीस ठाण्यातही दोन्ही गट भिडल्याची घटना घडली आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर शहरातील खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र शिंदे गटाचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाल्याने तणाव निर्माण झाला. तसंच यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राजन विचारे, केदार दिघे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला आहे. औरंगाबादेत सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार, सत्तार-शिरसाठ-भुमरेंना घेरणार!
पोलीस ठाण्यात असलेल्या ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी करत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी राजन विचारे, केदार दिघे तसेच युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात बाहेर पडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरीनंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेला राडा आता वरिष्ठ नेत्यांपर्यंतही जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. अन्यथा या राजकीय तणावाने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.