करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरचे पालकंत्री असलेल्या मुश्रीफ यांनी ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही उपस्थित होते. यावेळी जेव्हा बबनराव पाचपुते यांची बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सर्वांसमक्ष हा सल्ला दिला. पाचपुते म्हणाले, ‘सध्या प्रशासक नियुक्तीचा मुद्दा गाजत आहे. केवळ राजकारण नाही तर काही ठिकाणी यासाठी उघड सौदेबाजीही सुरू झाली आहे. मात्र, आपण हा मुद्दा आपल्या अंगावर घेऊ नका. यातून तुमची स्वत:ची आणि सरकारचीही अडचण होऊ देऊ नका. आपली जुनी मैत्री आहे. काही काळ सरकारमध्ये आपण मंत्रिमंडळात सहकारी होतो. तुम्हाला जवळून ओळखतो. एक संवेदनशील आणि चांगला मंत्री म्हणून तुमची ओळख आहे. प्रशासक नियुक्तीवरून जे काही सुरू आहे, ते तुमच्या नावाने सुरू आहे. तुमचीच अधिक चर्चा होत आहे. तुमच्या प्रतिमेला या गोष्टी शोभणाऱ्या नाहीत. त्यामुळे मित्र म्हणून सल्ला आहे, की हा मुद्दा अंगावर घेऊ नका, जे असेल ते होऊ द्या.’ मात्र, मित्राचा हा सल्ला मुश्रीफांनी मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. यावर काहीही भाष्य त्यांनी केले नाही. ‘बैठक करोनासंबंधी आहे, त्यासंबंधी काही मुद्दे असतील तर ते मांडा,’ असे पाचपुतेंना सांगत मुश्रीफांनी विषय संपविला.
राज्यातील मुदत संपणाऱ्या चौदा हजार ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंबंधी अध्यादेश काढण्यात आला. त्यानंतर सुधारित परिपत्रकेही काढण्यात आली. ग्रामविकास मंत्री या नात्याने मुश्रीफ यांच्याकडे हा विषय येतो. विरोधकांनी यावर राजकीय दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय अशी टीका करून सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सरपंच परिषदेनेही या निर्णयाला विरोध करून कोर्टात धाव घेतली आहे. यासंबंधी वेगवेगळ्या मागण्या आणि टीका सुरूच आहे.
तर दुसरीकडे प्रशासकपदी वर्णी लावण्यासाठीही राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली आहे. पुणे जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने अधिकृतपणे पत्र पाठवून प्रशासकपदी नियुक्ती हवी असेल तर पक्ष निधी जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर ते पत्र मागे घेण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असले तरी याचा संबंध राष्ट्रवादीशीच जास्त जोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाचपुते यांनी मुश्रीफांना दिलेला मित्रत्वाचा सल्ला लक्षवेधक ठरतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times