Natasha Awhad News, वडिलांवरील आरोप म्हणजे आमच्यावरच व्यक्तीगत हल्ला; आव्हाडांच्या मुलीने खंबीरपणे मांडली बाजू – ncp leader jitendra awhad daughter natasha awhad reaction on police case in kalva mumbra
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. मात्र ही तक्रार राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा दावा आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनीही भूमिका मांडली आहे. ‘विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबालाच प्रचंड मानसिक त्रास होत आहे. एक महिला म्हणून माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी हा धक्का होता. मी नेहमीच महिला सशक्तीकरणाच्या बाजूने उभी राहिली आहे. मात्र अशा खोट्या तक्रारींमुळे महिलांची पूर्ण चळवळच भरकटली जाते. न्यायव्यवस्थेने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्हाला योग्य न्याय मिळेल,’ अशी आशा नताशा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
‘आमच्या कुटुंबातील प्रत्येकावर हा व्यक्तीगत हल्ला’
‘राजकारणात वाद-विवाद नेहमीच होत असतात. मात्र तुम्ही असे गंभीर आरोप करता तेव्हा तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्याच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या कॅरेक्टरवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात. मी नेहमीच फेमिनिझमच्या बाजूने उभी राहिली आहे. कारण माझ्यावर कुटुंबातून तसे संस्कार झाले आहेत. तुम्ही जेव्हा माझ्या वडिलांवर असे आरोप करत असता तेव्हा तो आमच्या कुटुंबातील प्रत्येकावरच व्यक्तीगत हल्ला असतो,’असं म्हणत नताशा आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचं आमचं म्हणणं असलं तरी आम्ही कुठेही यंत्रणेच्या विरोधात जात नाही. जो कायदेशीर मार्ग आहे त्यानेच आम्ही लढा देत आहोत, असंही त्या म्हणाल्या.