कच्छ : एका भीषण घटनेमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी नर्मदा कालव्यात बुडून दोन जोडपे आणि एका तरुणासह पाच जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन महिला, एक १५ वर्षीय मुलगी आणि दोन पुरुषांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती स्थानिक प्रागपार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेची माहिती देताना कच्छ पश्चिम एसपी सौरभ सिंह यांनी सांगितले की, मुंद्रा येथील गुंडाला गावात नर्मदा कालव्यात एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. कालव्यातून पाणी आणत असताना घसरलेल्या महिलेला वाचवण्यासाठी इतर कुटुंबीयांनीही कालव्यात उडी घेतली. पण दुर्देवाने यामध्ये सगळ्यांचा बुडून मृत्यू झाला.