डॉक्टर गणेश राख असं या खऱ्याखुऱ्या हिरोचं नाव आहे. डॉक्टर गणेश राख हे पुण्यातील हडपसर भागात मेडिकेअर हॉस्पिटल चालवतात. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलगी जन्मली तर एकही रुपया फी आकारली जात नाही. इतकंच नाही तर मुलगी जन्मल्यास मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अक्षरशः दिवाळी असते. फुलांची आरस सजवली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणल्या जातात आणि वाजत गाजत मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत होतं. गणेश राख यांनी सुरू केलेला हा उपक्रम आज एक चळवळ बनला आहे. डॉक्टर गणेश राख यांनी या चळवळीला मुलगी वाचवा अभियान असं नाव दिले आहे.
डॉक्टर गणेश राख हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील आहे. घरी १८ विश्व दारिद्र्य अशात गणेश राख हे पैलवान. मोठ्या-मोठ्या कुस्त्या ते खेळायचे. मोठ होऊन पैलवान होणार हे त्यांचे स्वप्न… वडील पुण्यात हमाल होते. आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करायची. मग हे स्वप्न पूर्ण होणार तरी कसं? “सर्वांचं जेवण तू एकटाच संपवशील आणि बाकी सगळे उपाशी राहतील,” असं डॉक्टरांची आई त्यांना म्हणायची. त्यामुळे गणेश यांनी मग डॉक्टरकी करायचं ठरवलं. आईचा आधार घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. समाजात भेदभावाला सामोरे जात आणि परिस्थितीवर मात करत गणेश डॉक्टर झाले.
अकरा वर्षांपूर्वी सुरू झाली चळवळ…
अकरा वर्षांपूर्वी ३ जानेवारी २०१२ रोजी डॉक्टर गणेश राग यांनी या चळवळीला सुरुवात केली. डॉक्टर गणेश राख यांनी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्यांना अनेक अनुभव आले. यामध्ये मुलगा जन्माला तर परिवार आनंद उत्सव साजरा करायचं. खुशीने बिल सुद्धा द्यायचे. मात्र, याउलट मुलगी झाली की मातेला आणि मुलीला भेटायला सुद्धा कुटुंबातील लोक येत नसायचे. बिल देण्यासाठी टाळाटाळ केली जायची. त्यामुळे डोक्यात एक कल्पना आली कुटुंब जर मुलीच्या जन्माचे स्वागत करत नसेल तर आपण हॉस्पिटलच्या वतीने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करायचं आणि एकही रुपया फी घ्यायची नाही असं ठरलं आणि ही चळवळ सुरू झाली असं डॉ. गणेश राख सांगतात.
या अकरा वर्षांमध्ये २४३० मुलींच्या जन्माचे स्वागत मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं आणि या मुलींच्या जन्माचे बिलसुद्धा हॉस्पिटलमार्फत माफ करण्यात आलं आहे. डॉक्टर गणेश राख यांनी अकरा वर्षांपूर्वी सुरू केलेली ही चळवळ आज देश विदेशात पोहोचली आहे. डॉक्टर गणेश राख यांच्या या चळवळीसोबत आता जवळपास ४ लाखांपेक्षा जास्त खाजगी डॉक्टर १३ हजार सामाजिक संस्था २५ लाखांपेक्षा जास्त स्वयंसेवक जोडले गेले आहेत. या सगळ्या लोकांनासोबत घेऊन मुलगी वाचवा अभियानाच्या देशभरात १००० पेक्षा जास्त रॅली डॉक्टर गणेश राग यांच्या वतीने काढण्यात आले आहेत.
सुरवातीला झाला विरोध…
डॉक्टर गणेश राख यांनी ही चळवळ ज्यावेळेस सुरू केली. त्यावेळेस त्यांना मित्र आणि कुटुंबातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. घरी सुरुवातीपासूनच गरिबी असल्याने त्यात मुलगा डॉक्टर झाल्याने आता दिवस बदलतील अशी आशा कुटुंबाला होती. मात्र, गणेश राख यांनी मुलीच्या जन्माचा एकही रुपये घेणार नसल्याचे सांगितलं कुटुंबाने याला सुरुवातीला विरोध केला. पण तरी ते थांबले नाहीत. अखेर डॉक्टर गणेश राख यांची आज देश-विदेशात पोहोचलेली ही चळवळ सुरू झाली.