accident in pune district, Pune Accident : पतीसोबत उपचारासाठी जाताना भीषण अपघात; २२ वर्षीय गर्भवती तरुणीचा जागीच मृत्यू – a 22 year old pregnant woman died on the spot in accident while going to the hospital with her husband
पुणे : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारुळवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी टाहो फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्या रमेश कानसकर (वय २२) असे या महिलेचे नाव आहे.
दोन ट्रॉली घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने जन्माला येण्यापूर्वीच बाळालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. सदर अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते. या घटनेची तक्रार मृत महिलेचे पती रमेश कानसकर यांनी दिली असून चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे असं ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांनी कोर्टात थेट जुना व्हिडिओच दाखवला; प्रकरणात नवा ट्विस्ट?
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्या कानसकर या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील असून आपल्या पती व आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आल्या होत्या. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. रस्त्यात गतिरोधक आला म्हणून विद्या या गाडीवरून खाली उतरल्या. मात्र समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला. या धक्क्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यानंतर उपचारासाठी विद्या यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या कडांवर दुचाकी घसरून अनेक अपघात होत आहेत. ६ महिन्यांपूर्वी देखील या परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे अजून किती जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.