मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत दारुण पराभव झाला. इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव झाल्यानं भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. २००७ ते २०१३ या कालावधीत टीम इंडियानं टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक जिंकला. मात्र त्यानंतरच्या ९ वर्षांत भारताला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता बीसीसीआय अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे.

टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं टी-२० संघात अनेक महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू केली. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देण्याचा विचार सुरू आहे. टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांत वेगवेगळा कर्णधार, प्रशिक्षक असावेत याची चाचपणी केली जात आहे. बीसीसीआय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा संघाशी जोडून घेण्याचा विचार करत आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियानं कशाप्रकारे खेळायला हवं, याची जबाबदारी धोनीकडे दिली जाऊ शकते.
इंग्लंडकडून पराभव, रोहित रडला; खेळाडू बॅगा भरू लागले; मध्यरात्री सर्वांना मेसेज आला अन्…
धोनीची भूमिका काय असणार?
टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१ मध्ये धोनी भारताचा मेंटॉर होता. मात्र त्यावेळी त्याची भूमिका केवळ एका स्पर्धेशी संबंधित होती. त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसला नाही. आता यावेळी धोनीला अधिक मोठी जबाबदारी देण्याचा विचार सुरू आहे. आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू धोनीच आहे. इतर कोणत्याच कर्णधाराला हा पराक्रम जमलेला नाही. आयसीसीच्या स्पर्धा, त्यावेळी येणारा दबाव, जुन्या-नव्यांची सांगड, वर्कलोड व्यवस्थापन यांचा खूप मोठा अनुभव धोनीच्या गाठीशी आहे. त्याचा फायदा टीम इंडियाला मिळावा यादृष्टीनं बीसीसीआय विचार करत आहे.
शाहीन आफ्रिदीची दुखापत निव्वळ ‘बहाणा’? फायनलमध्ये नक्की होता पाकिस्तानचा पराभव; कारण…
एम एस धोनी आयपीएल २०२३ नंतर आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे बराच वेळ असेल. त्यामुळे त्याच्याकडे टीम इंडियाच्या टी-२० संघाला हाताळण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला तिन्ही प्रकारात एकाचवेळी काम करणं अवघड जात आहे.

बीसीसीआय लगेच मोठे बदल करणार?
टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषकातील पराभवाला अद्याप आठवडादेखील झालेला नाही. मात्र बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा पवित्रा बीसीसीआयनं घेतला आहे. पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. मात्र त्याआधी २०२३ मध्ये एकदिवसीय स्पर्धा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here