यासंदर्भात फॉरेन्सिक तज्ज्ञ इंद्रजित राय यांनी एका वृत्तवाहिनशी बोलताना श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात फॉरेन्सिक तपास कशाप्रकारे महत्त्वाचा ठरेल, याबाबत माहिती दिली. आफताबने मेहरौली येथील फ्लॅटमध्ये श्रद्धाचा खून केला होता. त्यानंतर रक्ताळलेल्या कपड्यांची विल्हेवाट लावली. तिचा मृतदेह त्याने बाथरुममध्ये नेला, शेजारच्या दुकानातून फ्रीज घेतला. नंतर तिच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्याने एक-एक करून श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे विविध ठिकाणी फेकून दिले. मात्र, आफताबने श्रद्धाचा खून करताना किंवा तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकताना कोणीही त्याला पाहिलेले नाही. त्यामुळे याप्रकरणात पोलिसांकडे आफताब याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही.
अशा परिस्थितीत पोलिसांना फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करावा लागणार आहे. पोलिसांनी आफताबचे कपडे, बुट आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. याआधारे आता तपासाला सुरुवात झाली आहे. फॉरेन्सिक तपासात आफताबच्या बुटांमध्ये मेहरौलीच्या जंगलातील माती किंवा श्रद्धाचे केस अशाप्रकारच्या काही गोष्टी सापडतात का, हे पाहिले जाईल. याशिवाय, मेहरौली येथील फ्लॅटमध्ये श्रद्धाचे केस किंवा रक्ताळलेले कपडे यापैकी काही मिळते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. जेणेकरून फ्लॅटवरील आणि जंगलातील गोष्टी एकमेकांशी पडताळून पाहता येतील. यावरुनच आफताबने श्रद्धाचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात नेऊन फेकले, हे स्पष्ट होईल. दोन्ही घटनास्थळांवरील गोष्टी जुळत असल्यास पोलिसांना खूनाची नेमकी घटना सिद्ध करता येईल.
मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाचे हात-पाय आणि कंबरेची हाडं मिळाली
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. आफताबने पूनावाला याला मंगळवारी पोलिसांनी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात नेमके कुठे फेकले होते, याची माहिती घेण्यात आली. आतापर्यंत पोलिसांना श्रद्धाचे हात-पाय आणि कंबरेची हाडं मिळाली आहेत. श्रद्धाच्या डोक्याचा भाग अद्याप मिळालेला नाही. आता पोलिसांना या हाडांची फॉरेन्सिक तपासणी करावी लागेल.
आफताबने जंगलात फेकलेले श्रद्धाच्या शरीराचे तुकडे अनेक दिवस उलटून गेल्यामुळे पूर्णपणे कुजले आहेत. त्यामुळे जंगलात मिळालेली हाडं तपासातील महत्त्वाचा दुवा ठरतील. श्रद्धाच्या आई-वडिलांचा डीएनए आणि हाडांमधील डीएनए एकच आहे का, हे तपासून पाहिले जाईल. ही हाडं श्रद्धाचीच आहेत, हे स्पष्ट झाल्यावर ते भक्कम पुरावे ठरतील.
यापूर्वी निठारी हत्याकांडावेळी फॉरेन्सिक तपास अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. त्यावेळीही आरोपींनी संबंधित मुलींची हत्या करून त्यांच्या शरीराचे काही तुकडे नाल्यात फेकले होते तर काही तुकडे जमिनीत पुरले होते. त्यामुळे पोलिसांनी मुलींच्या हाडांच्या आधारे फॉरेन्सिक तपास करुन त्यांचा डीएनए शोधून काढला होता. या पुराव्यांच्या आधारे निठारी हत्याकांडातील दोषींना शिक्षा झाली होती.