आर्मीत निवड झालेल्या सैनिकांना विशेष प्रशिक्षण घेऊन पॅराकमांडोचा दर्जा मिळत असतो. पण त्यासाठी अतिशय खरतड प्रशिक्षण घ्यावे लागते. यावर्षी तंगधर, कुपवाडा काश्मीर येथे २० हजार सैनिक पॅराकमांडोच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. या सैनिकांपैकी केवळ चार सैनिकांनी हे प्रशिक्षण यशश्वीरित्या पूर्ण केले. यात गणेश पोरटे याचाही समावेश आहे. ९० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विविध कठीण टप्पे पार करावे लागतात.
या प्रशिक्षणादरम्यान ३६ तासांत १७ किलोचे वजन घेऊन १०० किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. सोबत १० हजार स्क्वेअर फुटावरून उडी मारणे, जंगलात रात्रंदिवस वास्तव्य करणे, यासह अतिशय कठीण परिस्थितीत हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. पॅराकमांडोचं प्रशिक्षण हे सर्वात कठीण प्रशिक्षण मानले जाते. यात शारीरिक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेची पराकोटीची कसोटी लागते. गणेशने हे प्रशिक्षण यशश्वीरित्या पूर्ण केले. पॅराकमांडो झाल्यानंतर त्यांना मरीन कॅप दिली जाते. सोबत स्पेशल फोर्समध्ये त्यांचा समावेश होतो.
वटराणासारख्या आदिवासीबहुल गावातील गणेशने अतिशय संघर्ष करून मिळवलेल्या यशाची माहिती होताच मित्रमंडळींनी प्रचंड आनंद व्यक्त केला. कधीकाळी बांधकामासाठी मजूर म्हणून जाणारा, शेतात नांगर हाकणारा तरूण आर्मीत गेला आणि तिथे त्याने मेहनतीच्या जोरावर पॅराकमांडो होण्याचा मान मिळवला, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याच्या भावना चंद्रपूर जिल्ह्यात व्यक्त करण्यात येत आहेत.