गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण शिंदे गटात का प्रवेश केला या बाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. या वेळी पत्रकारांनी कीर्तीकर यांना आज त्यांचे जुने सहकारी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांचा वाढदिवस असल्याने तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्ना विचारला. त्यावर उत्तर देताना कीर्तीकर म्हणाले की, मी संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन ते तीन वेळा फोन केला. मात्र त्यांनी माझा फोन उचलला नाही. शेवटी मी त्यांना मेसेज केला.
उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर अन्याय केला
यावेळी कीर्तीकर यांनी आपल्यावर उद्धव ठाकरे यांनी कसा अन्याय केला याचा पाढाच वाचला. ते म्हणाले, मला बाळासाहेबांनी २००४ निवडणुकीत तिकिटं दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे विरोध करत होते. तसेच २००९ च्या निवडणुकीतही माझे तिकीट कापले. २०१४ मध्ये एनडीएमध्ये मला मंत्रिपद न देता सावंत याना मंत्रीपद दिलं, गटनेतेपदाच्या वेळीही मला डावलले. हे सगळे अपमानास्पद आहे. म्हणूनच मी शिंदे गटात गेलो.
माझे आयुष्य शिंदे यांच्या शिवसेनेत घालवणार- कीर्तीकर
शिवसेनेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत गेल्यामुळे पक्ष कमजोर होत चालला आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठीच मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कीर्तीकर म्हणाले. मी माझे आयुष्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच घालवणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.