वांद्रे पोलिसांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन आदित्य चोप्रा यांची कसून चौकशी केली. चोप्रा यांचा बंगला वर्सोवा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असल्याने वर्सोवा येथेच ही चौकशी करण्यात आली. यशराज फिल्म्सने सुशांतबरोबर केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सुशांतला देण्यात आलेल्या चित्रपटांच्या ऑफर्सबाबत पोलिसांकडून चोप्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या चौकशीनंतर चोप्रा यांनी मीडियाला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. दिग्दर्शक शेखर कपूर हे सुशांतला घेऊन पानी हा सिनेमा बनवणार होते. या सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्समार्फत होणार होती. मात्र, हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. या सिनेमासाठी सुशांतने ११ महिने कठोर मेहनत घेतली होती. मात्र, अचानक हा सिनेमा बंद झाल्याने त्याला नैराश्य आलं होतं, असं शेखर कपूर यांनी पोलिसांना सांगितलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर चोप्रा यांची चौकशी करण्यात आली.
सुशांतने सोबतचा करार मोडला होता आणि मलाही करार मोडायला सांगितलं होतं, असं रिया चक्रवर्तीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आज आदित्य चोप्रा यांच्याकडून या संदर्भात काय माहिती घेतली याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
पोलिसांनी काल सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती. सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३७ लोकांची कसून चौकशी केली आहे. पोलीस अजूनही काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times