मान्यानं तिच्या डायरीत इंग्रजीमध्ये तिच्या अडचणी, व्यथा मांडल्या आहेत. आयुष्य प्रत्येक क्षणी आम्हाला त्रास देतंय. कधी कधी वाटतं आयुष्यच संपवून टाकावं. माहीत नाही ते कोण लोक आहेत, जे माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू पाहताहेत. कदाचित मला माहित्येय ती माणसं कोण आहेत. आम्ही आनंदी आहोत ते त्यांना बघवत नाही. मला अजून काही लिहायचं नाही. सगळं व्यवस्थित झाल्यास मी स्वत:च डायरीची पानं फाडून टाकेन, असं मान्यानं डायरीत लिहिलं आहे. हे सगळं बंद करा. मला आता आराम करायचाय, असं मान्यानं एका पानावर लिहिलं आहे.
मान्या आणि मानवी दोघीही अभ्यासात अतिशय हुशार होत्या. दोघी घराजवळच्या सेंट्रल अकादमीत शिकत होत्या. मान्या आणि मानवी अभ्यास अत्यंत हुशार होत्या. मान्या नववीत, तर मानवी सातवीत शिकत होती. सहामाही परीक्षेत मान्याला ८६.६६ टक्के, तर मानवीला ७३.९ टक्के मिळाले होते, असं शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कौशिक यांनी सांगितलं. शाळेचं शुल्क भरण्यास उशीर होईल, असं त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं होतं. आम्ही त्यांना सवलत दिली होती. त्यांचं शुल्क बाकी होतं. मात्र त्यामुळे त्यांचा अभ्यास थांबला नव्हता. शिक्षणात खंड पडला नव्हता, असं कौशिक म्हणाल्या.
मान्या आणि मानवी यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यानंतर कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. २० वर्षांपूर्वी गोरखपूरला येत असताना वडील जितेंद्र यांनी मैरवा रेल्वे स्थानकात अपघातात एक पाय गमावला. त्यानंतर त्यांनी कृत्रिम पाय लावण्यात आला. जितेंद्र यांच्या पत्नी सिम्मी यांना कर्करोग झाला. २ वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. सहा महिन्यांपूर्वी जितेंद्र यांच्या आईची प्राणज्योत मालवली.
जितेंद्र आणि त्यांच्या भावांमध्ये संपत्तीची वाटणी झाली होती. जितेंद्र त्यांच्या कृत्रिम पायाच्या मदतीनं शिलाईचं काम करायचे. त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी जितेंद्र यांचे वृद्ध वडील प्रकाश सुरक्षा रक्षकाचं काम करायचे. जितेंद्र यांच्या दोन मुलींनी चार वर्षांपासून घरात दोन पोपट पाळले होते. त्यांच्या पिंजऱ्यावर कपडा टाकण्यात आलेला होता. त्या शेजारीच पोलिसांना सुसाईड नोट सापडली. आमच्या मृत्यूनंतर पोपटांना सोडून द्या, असं चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कुटुंबियांनी पोपट सोडून देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उडाले नाहीत.