आफताबनं श्रद्धाचा खून रागाच्या भरात केलेला नाही. त्यानं नियोजनबद्ध रितीनं कट रचला आणि श्रद्धाला संपवलं, असा संशय पोलिसांना आहे. ‘आफताब अचानक श्रद्धाला घेऊन दिल्लीला राहण्यास आला. छतरपूरमधील फ्लॅटवर आल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत त्यानं तिला संपवलं. श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. तिथून परतल्यानंतर दहाव्या दिवशीच आफताबनं श्रद्धाला निर्घृणपणे संपवलं. यानंतर त्यानं मृतदेहाची अतिशय हुशारीनं विल्हेवाट लावली,’ असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आफताबच्या हातावरील जखमेवर उपचार करणारे डॉ. अनिल सिंह या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार ठरू शकतात. सिंह छतरपूरच्या ऍपेक्स रुग्णालयात कार्यरत आहेत. ‘आफताब मे महिन्यात रुग्णालयात आला होता. त्याच्या हातावर जखम होती. तो इंग्रजीत बोलत होता. तो मला आक्रमक, उद्धट वाटला. त्याची चलबिचल सुरू होती. तो मोठ्यानं आणि सलग बोलत होता. सामान्यत: रुग्ण अशाप्रकारे बोलत नाहीत. त्याचं वागणं विचित्र वाटत होतं,’ असं सिंह म्हणाले.
डॉ. सिंह यांनी आफताबच्या जखमेवर उपचार केले. ५ ते ६ टाके घातले. जखमी कशी झाली, असा प्रश्न त्यांनी आफताबला विचारला. त्यावर फळं कापताना सुरी लागल्यानं त्यानं सांगितलं. कोणासोबत हाणामारी झाली का, असं डॉक्टरांनी विचारून पाहिलं. त्यावर त्यानं नकारार्थी उत्तर अतिशय आत्मविश्वासानं दिलं.