‘बाळासाहेबांचे स्मारक हे जनतेसाठीचे स्मारक आहे. स्मारकाच्या समितीत कोण आहे याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. स्मारकाचे काम लवकर झाले पाहिजे, ही आमची इच्छा आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘मी मुख्यमंत्री असताना आम्ही या स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला होता,’ अशी आठवण करून देऊन फडणवीस म्हणाले, ‘आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्मारकाचे काम पूर्ण होईल. जनतेला यातून प्रेरणा मिळावी म्हणून हे स्मारक बनावे. खासगी वा वैयक्तिक बैठकांसाठी या स्मारकाचा वापर होऊ नये. स्मारकाचे कामकाज चालताना नियमांचे पालन व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.’
‘हे स्मारक जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल. त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी नमूद केले. ‘बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५० टक्के काम झाले आहे. मार्च २०२३च्या आधी स्मारकाचे काम पूर्ण होईल. दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. यामध्ये ऑडिओ-व्हिडीओ, बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्र यांचा संग्रह असेल. बाळासाहेबांचा राजकीय प्रवासाबाबतचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल,’ असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे,’ अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. ‘बाळासाहेबांचे स्मारक कुठल्या वैयक्तिक कुटुंबाचे किंवा घराण्याचे नाही,’ अशी पुस्ती लाड यांनी जोडली.
स्मृतिस्थळी गोमुत्राचे शिंपण
बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळनंतर भेट दिली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या स्मृतिस्थळापाशी जमले व त्यांनी तेथे गोमूत्र शिंपडले. हे शुद्धीकरण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे अता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.