पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात हे बेंगळुरूतील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. रंजित यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. दिवाळीनिमित्त सुटी असल्याने प्रभात, त्यांची पत्नी स्वाती व मुलगा ऋतिक हे रंजित यांच्याकडे आले. रंजित व त्यांच्या नातेवाइकांनी पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं. १२ नोव्हेंबरला सर्वजण मोठ्या कारने (एमएच-०४-डीआर-९१९४) पंढरपूरला गेले. तेथील धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन मंगळवारी दुपारी शिर्डी येथे आले. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन दुपारच्या सुमारास सर्वजण नागपूरकडे निघाले.
कार संजय लक्ष्मण कनोजिया चालवित होता. तो भरधाव कार चालवित असल्याने त्याला तीन वेळा हटकलेही. त्यानंतरही त्याने कारचा वेग कमी केला नाही. बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खापरी परिसरात संजयचे कारवरील नियंत्रण सुटले. कार उभ्या ट्रकवर (पीपी-१३-बीएच-६७६७) मागून आदळली. वेग अधिक असल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात रंजित व प्रभात यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १० जण जखमी झालेत.
एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने बेलतरोडी पोलिसांना कळविले. ताफा तेथे पोहोचला. जखमींना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. जखमींपैकी स्वाती व प्रमिला यांची प्रकृती चिंताजनक आहे.