रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील साखरपा जाधववाडी येथे रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन एसटी बसने पेट घेतला. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सुदैवाने प्रसंगावधान राखत बसची मागील बाजूची काच फोडून प्रवासी बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. पलटी झाल्यावर क्षणार्धात बसने पेट घेतल्याने सगळयांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. या सगळ्या गोंधळात एकूण १३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जखमींना तातडीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दोन रुग्णवाहिकेतून साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर रत्नागिरी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तातडीने साखरपा पोलीस स्थानकाचे हे.कॉ. संजय मारळकर, महिला पोलीस नाईक अपर्णा दुधाने, शिवाजी पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून सर्व प्रवाशांना मदत करत बाहेर काढले आणि धीर दिला.