मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

‘वीर सावरकरांविषयी कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य किंवा त्यांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे. हे सांगितल्यानंतर आमचा विषय संपला आहे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राऊत यांनी राहुल गांधींना एक सल्लाही दिला आहे.

‘माफीवीर’; पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच काँग्रेस कार्यकर्त्याने लावले पोस्टर, वातावरण तापलं

‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तर अधिक प्रतिसाद मिळाला. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून ही यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत सावरकरांचा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. या मुद्द्यामुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेसलाही धक्का बसला आहे. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. इतिहासात काय घडलं, याकडे लक्ष देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Milind Narvekar : कुख्यात डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न, मिलिंद नार्वेकर यांची हजेरी

दरम्यान, ‘वीर सावकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. आता भाजप आणि इतर पक्षात जे नवे सावरकर भक्त तयार झाले आहेत, ते लोक आमची ही मागणी का उचलून धरत नाहीत, असा माझा प्रश्न आहे. वीर सावरकर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. मात्र आता राजकारणासाठी त्यांनी हा मुद्दा हाती घेतला आहे,’ असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here