बुलढाणा : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप, मनसेसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून राहुल गांधींविरोधात हल्लाबोल केला जात आहे तर काँग्रेस आणि पुरोगामी गटाकडून त्यांचं आक्रमकपणे समर्थन केलं जात आहे. अशातच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही या सर्व वादावर भाष्य करत राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे.
‘राहुल गांधी यांनी जे सत्य आहे तेच सांगितलं आहे. कारण विनायक सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेंशनही घेतली होती. तसंच पुढील काळात इंग्रजांसाठी कामही केलं होतं. त्यामुळे सत्य जर सांगायला आपण घाबरलो तर आपण सत्याशी दगाबाजी करत आहोत,’ असं म्हणत तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांचं समर्थन केलं आहे. मी कित्येक दिवसांपासून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा विचार करत होतो. जे पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी होणं गरजेचं आहे. शेगावमध्ये ही यात्रा येत आहे, असं कळताच मी या यात्रेत येण्याचा निर्णय घेतला. कारण हे माझं जन्मस्थळ आहे, असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. भारत जोडो यात्रेत नवा इतिहास, गांधी-नेहरु परिवार एकत्र, महात्मा गांधींचे पणतू सहभागी
सावरकरांचे नातू कायदेशीर लढा देणार
एकीकडे महात्मा गांधी यांचे पणतू असलेल्या तुषार गांधींनी राहुल यांचं समर्थन केलेलं असतानाच दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषांचा राहुल गांधींनी अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून खटला दाखल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली, असे खोटे विधान करून त्यांची बदनामी केली असल्याचा दावा रणजीत सावरकर यांनी या पत्रात केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.