‘राहुलजी गांधी यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची सभा उधळून लावू, असा इशारा मनसेनं दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जयराम रमेश म्हणाले की, ‘सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही.’
दरम्यान, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी घेतला. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल,’ असं जयराम रमेश यांनी सांगितलं आहे.