टेंडर ट्रान्स्फर आणि टाइमपास
मुंबई महानगरपालिकेत सध्या टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास या या तीन गोष्टी सुरू असल्याचे सांगत ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आणल्यानंतर घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात मुंबईतील रस्ते एका रात्रीत चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटी रुपये देणार या बरोबरच, दहीहंडीला खेळाचा दर्जा, राज्यात फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणणार या घोषणांचा देखील समावेश होता. या सर्व घोषणांचे काय झाले, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबईतील रस्ते चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले खरे, मात्र ते रद्दही करण्यात आले. मग आता रस्त्यांचे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. दरवर्षी दोन ते अडीच हजारांचे टेंडर निघत होते. आता ते निघत नाही. आता हे डेंडर रद्द झाल्यानंतर हे ५ हजार कोटींचे रस्ते बनवणार कधी. एका रात्रीत चकाचक रस्स्ते कधी करणार. एखादा रस्ता बवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करावे लागतं. एका रात्रीत कसे काय रस्ते चकाचक करणार, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे रस्त्यांची कामे ही १ ऑक्टोबर ते १ जून या कालावधीत होत असतात, आणि आता तर नोव्हेंबर महिनाही जात आला आहे. सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे मागच्या वर्षातील कामेही धीमी झालेली आहेत. मग आता ५ हजार कोटींची टेंडर काढणार कधी, ती पास होणार कधी, वेगवेगळ्या टप्प्यांवर कामे करणार कधी असे सवाल उपस्थित करतानाच आता तर मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.