शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवासी देखील तेथे पोहोचले. सर्वांनी मिळून या ५ जणांना समुद्रातून बाहेर काढले. बचाव केलेल्या तीन जणांना जवळच्या केईएम व हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वरळी, कोळीवाडा येथील वाल्मिकी चौक भागात शेजारी-शेजारी राहणारी ही मुले होती. ही मुले शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला हनुमान मंदिराजवळ असलेल्या विकास गल्ली येथून समुद्रात खेळायला गेली. त्यावेळी समुद्राला ओहोटी लागली होती. मात्र खेळत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे ही सर्व मुले समुद्राच्या पाण्यात वाहत जात बुडू लागली.
स्थानिक नागरिकांनी या मुलांपैकी कार्तिकी, आर्यन व ओम या तिघांना समुद्रातून बाहेर काढले. मात्र कार्तिक चौधरी व सविता पाल हे दोघे दूर वाहून गेले. हे दोघे शोध घेतल्यानंतर सापडले. कार्तिकी पाटील हिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर चौघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कार्तिक चौधरी व सविता पाल यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीरात समुद्राचे पाणी जास्त प्रमाणात गेल्याने, तसेच त्यांचा श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, कार्तिकी हिला केईएम रुग्णालयात आणि आर्यन चौधरी याला हिंदुजा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ओम पाल याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.