मुंबई: मार्चपासून सुरू झालेला करोना संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात येत असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये तसेच दवाखान्यांची फेररचना करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे. करोना रुग्णांसह इतर व्याधी तसेच पावसाळी आजारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवरही पूर्वीप्रमाणेच उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज होणार आहे. त्यामुळे करोना नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराविना खोळंबून राहावे लागणार नाही. करोनामुळे ज्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या किंवा रखडल्या, त्याही पूर्वीप्रमाणे टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार आहेत. सुरक्षित अंतराचे नियम पाळून ही रचना पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू झाली आहे.

पालिकेची चार मुख्य रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येत्या आठवड्यापासून करोना आणि करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी वैद्यकीय उपचार दिले जातील. नायर रुग्णालयाचे रूपांतर हे पूर्णपणे करोना रुग्णालयामध्ये करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी करोनाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे विभाग सुरू करण्यात येणार आहेत. उपनगरीय १६ रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात करोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. तर इतर सहा रुग्णालये करोनासह अन्य आजारांसाठी तर उर्वरीत नऊ उपनगरीय रुग्णालयांमध्ये करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी रुग्णांवर उपचार होतील. पालिकेच्या महत्त्वाच्या चारही रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. कोणत्या आजारांचे शस्त्रक्रिया विभाग पहिल्या टप्प्यात सुरू करायचे, यासंदर्भातील कृती आराखडा रुग्णालयांनी पालिका प्रशासनाकडे द्यायचा आहे. डोळ्यांच्या उपचारपद्धतीही आज, सोमवारपासून सुरू होतील. कान, नाक, घसा रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना घरी सोडल्यानंतर दोन दिवस रुग्णालय बंद ठेवली जातील व त्यानंतर पुन्हा ती सुरू करण्यात येतील.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात सांगितले, ‘करोनाव्यतिरिक्तच्या आजारांसाठी वैद्यकीय उपचार तातडीने मिळायला हवेत. तसेच जम्बो सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.’ पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी, नायर रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पालिका रुग्णालयांतील करोनामुळे होत असलेल्या रुग्णांचा मृत्युदरही आता खाली येत आहे. रुग्णालयीन व्यवस्थेची पुनर्रचना करत असताना येथील जागा पूर्णपणे निर्जंतुक करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी एखादा दिवस रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवण्यात येईल. रुग्णालयातील खाटांची व्यवस्था, चादरी बदलणे, जैविक कचरा विल्हेवाट करण्यासाठीचे नियोजन आदी बाबींसाठी हा वेळ देण्यात येणार आहे.

‘ठाण्यातील रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था हवी’

पालिका रुग्णालयांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, नालासोपारा येथून दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. या रुग्णांना पालिका रुग्णालयांमध्ये उपचार दिले जातात. मात्र त्यांच्यासाठी विशेष वेगळी व्यवस्था द्यावी, अशी मागणी केली जात आहे. तशी सोय केल्यास मुंबईच्या संबधित भागांतील रुग्णसेवेवर भार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसूती, डायलिसिस, विविध शस्त्रक्रियांसाठीच्या सुविधाही सुरळीत सुरू ठेवण्यात येतील.

कामाच्या वेळा पूर्ववत होणार

मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा अभ्यास करून रोटेशन पद्धतीने काम सुरू होणार आहे. जे वैद्यकीय कर्मचारी करोनाच्या काळात काम करतात, त्यांना एक आठवडा काम व एक आठवडा रजा दिली जाते. संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आठवड्यात करोना नसलेल्या रुग्णालयांमध्ये ही घडी नव्याने बसवण्यात येईल. त्यानंतर कामाच्या वेळा पूर्ववत करण्यात येतील. करोनाचा संसर्ग सर्वच ठिकाणी पसरू नये हे लक्षात ठेवून नियोजन करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here