मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजपसह मनसेकडून राहुल गांधी यांच्याविरोधात हल्लाबोल केला जात आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना थेट माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरच निशाणा साधला. रणजीत सावरकर यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.

‘कोणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. हा देश विकासाच्या वाटेवर नेण्यात आणि विज्ञानाच्या दिशेने नेण्यात नेहरूंचं खूप मोठं योगदान आहे. जर सावकर विज्ञाननिष्ठ होते, असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या वाटेने देशाला पुढे नेण्याचं काम नेहरूंनी केलं आहे. अन्यथा या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची आज अवस्था आहे, तशी आपली अवस्था होऊन दिली नाही म्हणून हा देश नेहरूंचा ऋणी राहील,’ अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

चाकरमान्यांची गैरसोय; कर्नाक पूल पाडण्यासाठी आज रात्रीपासून मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सुरू असलेल्या वादंगात आता भरपूर वाद-प्रतिवाद झाला आहे. आमच्यासाठी सावरकरांसह महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे नेते प्रिय आहेत. स्वातंत्र्यसैनिक हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याबाबतचं स्पष्टीकरण देण्यासाठी ते आता हयात नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणावरही चिखलफेक करू नये,’ असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे.

राहुल गांधींचाही घेतला समाचार

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आज सामना या आपल्या मुखपत्रातूनही राहुल यांना फटकारलं आहे. ‘राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील,’ असं ‘सामना’ अग्रलेखात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here