सिंधुदुर्ग : कोकणची एक अनोखी आणि वेगळी परंपरा म्हणून ‘गावपळण’ परंपरा ओळखली जाते. मालवण तालुक्यातील ही परंपरा देवाचा कौल घेऊन दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात जोपासली जाते. देवाने दिलेल्या कौलनुसार चिंदर गावातील सर्व नागरिक पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर गेले आहेत. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.

तीन दिवस तीन रात्र वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आर्शिवचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले. घर बंद करुन दारावर नाराळाच्या झाडाच्या फांद्या (झावळ्या) बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावाच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गेली कित्येक वर्षे सुरु असलेल्या एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव या विज्ञान युगातही खाली होत होते.

अजित पवारांसह रोहित पवारही अडचणीत येणार? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता
कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावत पळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले. आता गजबजाट वाढला होता तो वेशीबाहेर. आता चिंदर ग्रामस्थ तीन दिवस तीन रात्र प्राण्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने निसर्गाच्या साथीने एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेणार आहेत.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून भटजींना विचारुन तारीख ठरवतात. गावपळणी दिवशी चिंदरवासीयांनी शुक्रवार सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते.

दुपारी अडीचच्या सुमारास बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोल-ताशेचा इशारा झाला आणि चिंदरवासी वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी सीमा जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला होता. या गावात ख्रिश्‍चन धर्मातील लोकं देखील मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते.

आता तीन दिवस तीन रात्र देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे. या तीन दिवसांत त्रिंबक येथील पावणाई मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो.

नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता; सावरकरांच्या नातवाला राऊतांचं प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here