मुंबई : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने केलेल्या चौकशीनंतर पवार कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांकडून संशयास्पद लिलावाद्वारे कारखाने खरेदी करण्यात आले आहेत का, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास केला जाणार आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना तसंच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने परवानगी दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पवार काका-पुतण्याचीही चौकशी होऊ शकते.

नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता; सावरकरांच्या नातवाला राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांसह एकूण ७५ जणांना दोन वर्षांपूर्वी ‘क्लीन चीट’ देणाऱ्या मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेत बदल झाला आहे. आरोपांबाबत फेरतपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती इओडब्ल्यूतर्फे काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली होती.

राणीच्या बागेत जायचंय? तिकीटचं नो टेन्शन, घरबसल्या करा तिकीट बुक

‘शिखर बँकेतील त्या-त्या काळच्या संचालक मंडळांतील संचालकांनी तसेच कर्ज मंजुरी समित्यांनी अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या तसेच संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे व सवलतीच्या दरांत कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी राज्य सरकारच्या सहकार विभागातील प्राधिकृत अधिकाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ८८ अन्वये तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर सप्टेंबर-२०१५ मध्ये आरोपपत्र ठेवले. शिवाय काहींनी फौजदारी कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दिली. तरीही कोणतीच कारवाई झाली नाही’, असे आरोप फिर्यादी अरोरा यांनी केले होते.

अरोरा यांनी २०१५साली फौजदारी जनहित याचिका केली होती. त्याची अत्यंत गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने तातडीने एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, ‘इओडब्ल्यू’ने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. त्यात अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरच हसन मुश्रीफ, राजन तेली, श्रीनिवास देशमुख, माणिकराव कोकाटे अशा अनेक बड्या राजकीय नेत्यांना आरोपी करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here