म. टा. प्रतिनिधी, मुंबई

तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने ७ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या मुंबईकरांना १ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोकणात गणपतीसाठी १४ दिवस आधी दाखल होण्याचा आदेश काढण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने चालवल्या होत्या. आता डिगस ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण इतर ग्रामपंचायतीही करण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून दरवर्षी काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गातील गावी येतात. मात्र करोनामुळे यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची वाट बिकट बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीचे इतिवृत्त सर्वत्र पोहोचले. यामध्ये ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सिंधुदुर्गात चाकरमान्यांना प्रवेशबंदी असे जाहीर करण्यात आले होते. टीका होताच हे इतिवृत्त तत्काळ रद्द करण्यात आले. मात्र, विविध ग्रामपंचायतींकडून एका मागोमाग एक निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये गावी पोहोचण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. अन्यथा मुंबईकरांना दंड ठोठावणे, इतर गावांतून नातेवाईक, मित्रमंडळी आणि माहेरवाशिणींनी आपल्या गावात येण्यापूर्वी विलगीकरण पूर्ण केल्याचा दाखला आणणे, गावात कुठेही सत्यनारायण पूजा घालू नये अशा विविध नियमांचा समावेश करण्यात आला आहे.

कोकणातील साधारण ३५ ते ४० टक्के घरे केवळ गणपती सणाच्या वेळी उघडली जातात. त्यामुळे अनेक मुंबईकर गणपतीपूर्वी तीन ते चार दिवस आधी कोकणातील घर गाठतात. अशावेळी विलगीकरण (७ ते १५ दिवस), साफसफाई (३-४ दिवस), मूळ उत्सव (किमान ५ दिवस) अशा नियमांच्या पूर्ततेसाठी १८ ते २० दिवस खर्ची पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला सुट्टी मिळवताना कसरत करावी लागणार आहे.

ग्रूप बुकिंग मिळेल का?

एसटी महामंडळाकडून दरवर्षी कोकणात जादा गाड्या सोडल्या जातात. तसेच चाकरमान्यांच्या मुंबईतील मंडळांकडून ग्रूप बुकिंगही मोठ्या प्रमाणात होते. हे बुकिंग ४५ दिवस आधी करणे अपेक्षित असते. यंदा रेल्वेगाड्यांची शक्यता धुसर असल्याने चाकरमान्यांना एसटीच्या जादा बसेसचा आधार होता. मात्र अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने एसटी महामंडळही संभ्रमावस्थेत आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी देखील, परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बस सोडल्या जातील, असे सांगितले आहे. त्यामुळे एसटी बस सोडण्याचे ठरल्यास ग्रूप बुकिंग दिली जाईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here