रावसाहेब दानवे हे आज जालन्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंडित नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता, या संजय राऊत यांच्या व्यक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ४०/५० वर्षांचा इतिहास उकरून काढण्यापेक्षा भविष्याचा विचार केला पाहिजे या व्यक्तव्याचा रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही सरकार चालवलं आणि त्यांच्याच मित्रपक्षाने सावरकरांबद्दल अशा प्रकारचे शब्द काढले. त्यांच्या सोबत तुम्ही पुढच्या काळात राहणार आहात का? त्यांच्यापासून फारकत घेणार आहात का? हा मुद्दा त्यानी सांगावा, उगाच विषय कुठल्या कुठे नेऊ नये, असा टोला ही दानवे यांनी मारला.
बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्याबद्दल महाराष्ट्र व देशाला त्यांचे मोठेपण समजावून सांगितले. त्यांचे चिरंजीव, नातू यांनी मात्र आज त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवले याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी करावा व भविष्यात सावरकरांच्या बाबतीत असे शब्दप्रयोग करणाऱ्यांसोबत तुम्ही राहणार, की सावरकरांचे समर्थन करणाऱ्यांसोबत राहणार याचा खुलासा करावा, असेही दानवे म्हणाले.
भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणला असे पत्रकारांनी विचारताच, आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? आम्ही मुद्दा घडवून आणला… ज्याला वाचन नाही, ज्याला या देशातील महापुरुषांबद्दल कल्पना नाही, त्यांच्या तोडून निघालेले हे शब्द आहेत.आम्ही कशाला सावरकराचा मुद्दा आणावा?, असे रावसाहेब म्हणाले.
सावरकर तर आमच्या तोंडात आहेत, सावरकर आमच्या आचरणात आहेत, सावरकर आमच्या विचारात आहेत हे आम्ही नाकारत नाही आणि हे आम्ही नाही घडवून आणले, आम्ही तर त्यांच्या विचारांचे पाईक आहोत यावर आम्हाला गर्व आहे. आम्ही काही ते झाकत नाही कोणापुढे, असे म्हणत दानवे यांनी आरोप खोडून काढले.