पुणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पलटली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे.

विजय शंकर डेरे (वय ६२, रा. नारायणगाव) असं मृत व्यक्तीचं नाव असून कारमधील रोहित विजय डेरे (वय २३), उज्ज्वला विजय डेरे (वय ४८), मोहित विजय डेरे (वय ३०), सविता अनिल शेटे (वय ४८), शैला दिलीप वारुळे (वय ५८), विनायक शिवाजी डेरे (वय ५०, सर्व रा. नारायणगाव) तसेच शोभा दशरथ वायाळ (वय ५४, रा. नांदुर, नाशिक) यांच्यासह रस्ता ओलांडणारी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय १२ ) अशी जखमींची नावे आहेत.

महाराष्ट्राला हे सहन होणार नाही; शिवरायांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप नेते राज्यपालांवर संतापले

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्ग डेरे कुटुंब हे नाशिक येथून अस्थी विसर्जन करून आपल्या नारायणगाव येथील घरी परतत होते. त्याचवेळी डोळासणे येथील बांबळेवाडी शिवारात वैष्णवी मेंगाळ ही चिमुकली रस्त्याच्या दुभाजकातून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागली. हे चालक असलेल्या विनायक डेरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारचा ब्रेक दाबला. वेग असल्याने ही कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. या अपघातात विजय डेरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकलीसह आठ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here