Maharashtra Politics | माणूस हा धर्मासाठी नव्हे तर धर्म हा माणसासाठी असतो, हे वास्तव शिवरायांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी प्रेरित केले. पहिल्यांजा सर्वसामान्य माणसाचं आणि रयतेचं राज्य कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला, या गोष्टी भाजपच्या नेत्यांना खुपतात का?, असे सवाल अमोल कोल्हे यांनी विचारले

 

हायलाइट्स:

  • या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये
  • माणूस हा धर्मासाठी नव्हे तर धर्म हा माणसासाठी असतो
  • महाराजांचा गनिमी कावा भाजपच्या नेत्यांना समजलाच नाही
पुणे: छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा कळला नाही. राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्यं केली जात आहेत. या सगळ्यांना शिवरायांची नेमकी कुठली गोष्ट खुपते, हे त्यांनी सांगावे. या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये. धर्मसत्ता आणि राजसत्तेने हातात हात घालून काम करावं, हा आदर्श शिवरायांनी घालून दिला, ही बाब तुम्हाला खुपते का? माणूस हा धर्मासाठी नव्हे तर धर्म हा माणसासाठी असतो, हे वास्तव शिवरायांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी प्रेरित केले. पहिल्यांजा सर्वसामान्य माणसाचं आणि रयतेचं राज्य कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला, या गोष्टी भाजपच्या नेत्यांना खुपतात का, अशा प्रश्नांची सरबत्ती अमोल कोल्हे यांनी केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांना जाब विचारला आहे.

शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे जगभरात कौतुक केले जाते. पण तोच गनिमी कावा तुम्हाला समजला नसेल तर मी तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो. नुकत्याच येऊन गेलेल्या शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाची लिंक पाठवतो. जेव्हा संपूर्ण भारतातील राजे, महाराज औरंगजेबाच्या दरबारात मान खाली घालून उभे राहायचे तेव्हा छत्रपतींनी भर दरबारात औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत दाखवली होती. स्वाभिमान काय असतो, हे त्यांनी शिकवलं होतं. त्यांच्याविषयी भाजपचे प्रवक्ते बेताल वक्तव्यं करतात, असे सांगत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे दाखवून देऊ; संजय राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल

शिवाजी महाराज आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत: अमोल कोल्हे

भारतीय लष्करातील सर्व बटालियनच्या वॉर क्राय या देवांच्या नावाने आहेत. फक्त मराठा रेजिमेंटची वॉर क्राय ही शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. छत्रपती शिवाजी महाराज भले देव नसतील, पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमीही नाही. शिवरायांनी आम्हाला अभिमान आणि अस्मिता काय असते, हे शिकवले. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी आपले वक्तव्यं मागे घेऊन माफी मागावी. तसेच याप्रकरणात भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी अमोल कोल्हे यांनी केली.
मोदीजी, माझी तुम्हाला विनंती, प्लीज कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे संतापले

सुधांशू त्रिवेदी नेमकं काय म्हणाले?

राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना, असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here