IND vs NZ : सूर्यकुमारने अवघ्या ५१ चेंडूंत १११ धावा फटकावल्या. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान ठेवता आले. भारताच्या गोलंदाजांनी त्यानंतर अचूक आणि भेदक मारा केला, त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही. त्यामुळे भारताने या सामन्यात विजय साकारला आणि मालिकेत आघाडी घेतली आहे.

भारताला रिषभ पंतच्या रुपात सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सूर्यकुमार यादवला आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. सूर्याने या संधीचं अक्षरश: सोनं करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. मैदानातील सर्वच भागात फटकेबाजी करत सूर्यकुमारने सामन्याच्या १९ व्या षटकात शतक साजरं केलं. ४९ चेंडूंत शतक करणाऱ्या सूर्याने पुढील दोन चेंडूंत एक चौकार आणि षटकार खेचत आपली धावसंख्या १११ वर नेली. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूंवर कर्णधार हार्दिक पांड्याने दोन धावा घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तर नंतरच्या तीन चेंडूंवर न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊथी याने भारताचे सलग तीन फलंदाज बाद करत हॅट्रिक घेण्यात यश मिळवलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.