बे ओव्हल: टी-२० विश्वचषक स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाबाद शतक साजरं केलं. कॅलेंडर वर्षातील दुसरं शतक झळकावत सूर्यानं संघाला १९१ धावांची मजल मारुन दिली. भारत २०० धावांचा टप्पा ओलांडेल असं वाटत होतं. मात्र शेवटच्या षटकात तीन गडी बाद झाले. सूर्याला स्ट्राईकच मिळाला नाही. त्यामुळे भारतीय संघाला द्विशतकी टप्पा ओलांडता आला नाही.

सूर्यकुमार यादवनं ५१ चेंडूंमध्ये १११ धावांची नाबाद खेळी उभारली. त्यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. सूर्यानं मैदानाच्या सर्वच बाजूंना फटके लगावले. त्याच्या फटकेबाजीपुढे न्यूझीलंडचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. भारताची फलंदाजी पूर्ण झाल्यानंतर सूर्याची लाईव्ह मुलाखत सुरू होती. हे शतक खास होतं. त्यात हार्दिक पांड्याची साथ मोलाची ठरली, असं यादव म्हणाला.
चेन्नईनं दाखवला बाहेरचा रस्ता; २६ वर्षांचा खेळाडू पेटला; ५ सामन्यांत ४ शतकं, विराटशी बरोबरी
टी-२० मधील शतक नेहमीच विशेष असतं. मला हार्दिक पांड्याची उत्तम साथ लाभली. शेवटपर्यंत खेळ असं हार्दिकनं सांगितलं होतं. वॉशिंग्टन सुंदर, दीपक फलंदाजीला येणार असल्यानं आमच्याकडे बरेच पर्याय होते. आम्ही या आव्हानाचा बचाव केल्यास तर आजचा दिवस माझ्यासाठी नक्कीच खास असेल, असं सूर्या मुलाखतीत म्हणाला.

सूर्याची मुलाखत सुरू असताना अचानक यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या ऋषभ पंतची एंट्री झाली. सूर्याच्या मागून पंत अचानक आला. तुझी खेळी अविश्वसनीय होती असं म्हणत पंतनं सूर्याला मिठी मारली. केवळ एक वाक्य म्हणून पंत तिथून निघून गेला.

सूर्याच्या फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात फिन ऍलनला माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे आणि केन विल्यमसननं अर्धशतकी भागिदारी रचली. नवव्या षटकात कॉन्वे बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरानं न्यूझीलंडचे फलंदाज बाद होऊ लागले. न्यूझीलंडचा डाव १२६ धावांवर संपुष्टात आला. दीपक हुड्डानं १० धावांत ४ फलंदाजांना बाद केलं. तर मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहलनं प्रत्येकी २ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here