म. टा. वृत्तसेवा, सिडको: येथील वालदेवी नदीच्या धरणावर सिडकोतील चौघे जण पोहण्यासाठी गेले असता, यातील तिघांचा दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मृतांपैकी एक जण मुंबई पोलिस दलात होता.

सिडकोतील मंगेश बाळासाहेब बागूल (वय ३३, रा. पाथर्डी फाटा), वैभव नानाभाऊ पवार (वय २६, रा. श्रीराम चौक, उत्तमनगर), महेश रमेश लाळगे (वय ३३, रा. महाकाली चौक, पवननगर) व गणेश एकनाथ जाधव (वय २९) हे चौघे जण पिंपळद येथील वालदेवी नदीच्या धरणावर गेले होते. सुरुवातीला गणेश जाधव सोडून तिघांनी पाण्यात पोहण्यास सुरुवात केली. मात्र या धरणकाठाजवळ खोली जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाले. हा सर्व प्रकार गणेश जाधव याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेत तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताच वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह उपनिरीक्षक नितीन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मंगेश, वैभव आणि महेश यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता.

मृत झालेल्या तिघांपैकी मंगेश बागूल हा मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होता. वैभव पवार याचे पुणे येथे एम. ई.चे शिक्षण सुरू असून, महेश लाळगे हा डाटा मेट्रिक्स येथे नोकरी करीत होता. मंगेश बागूलच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, आईवडील असा परिवार आहे. महेश लाळगेच्या पश्चात पत्नी, भाऊ, आईवडील असा परिवार आहे. वैभव पवार इंजिनीअर होता. त्याच्या पश्चात बहीण, आईवडील असा परिवार आहे.

मित्राला वाचविताना तिघे बुडालेमित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला एकच जण पाण्यात उतरला होता, मात्र तो बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्याने व नंतर तिसऱ्याने पाण्यात उडी घेतली असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मालेगावजवळ पर्यटनस्थळी दोन तरुणांचा बुडून मृत्यू

मालेगावजवळील पर्यटनस्थळावर तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पोवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, अंदाजे वीस वर्षे वयाचे हे तरुण धबधब्याच्या खाली तयार झालेल्या तळ्यात दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघेही वाहून गेले. एका प्रत्यक्षदर्शीने तातडीने पोलिसांना कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर या तरुणांचे मृतदेह हाती लागले. जबीर सुलेमान शाह आणि सलमान अयूब शेख अशी मृतांची नावे असून, ते मालेगावजवळील निहालनगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी एस. पी. मोरे यांनी दिली. या तरुणांबरोबर आणखी दोन तरुण असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे, मात्र पोलिसांना तसे आढळले नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here