याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीकडे खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम आहे. या कंपनीचे ऑपरेटर अमोल अशोक नाचरे (रा. उंबर्ले, ता. दापोली) व प्रथमेश विश्वनाथ शिर्के(रा. तळे, ता. खेड) हे कर्मचारी आहेत, बँकेमधून कॅश घेऊन पैसे घेऊन ती एटीएम मशिनमध्ये लोडिंग करण्याचे काम हे दोघे कंपनीच्या वतीने दापोली व खेड विभागकरता देण्यात आले आहे.
११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अॅक्सिस बँकेच्या ३ व स्टेट बँकेच्या २ एटीएममध्ये भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले ५५ लाख ५० हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये न भरता या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे (रा. घणसोली, नवीमुंबई) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
ही रक्कम येथील बँकेकडून ताब्यात घेऊन ती एटीएममध्ये लोड करायचे अत्यंत जबाबदरीचे व जोखमीचे काम या दोघांकडे देण्यात आले होते. मात्र, या दोघांनीही तब्बल ५५ लाख ५० हजार इतकी मोठी रक्कम ताब्यात घेऊन ती एटीएममध्ये लोडिंग केली नाही. त्यामुळे या रक्कमेचे नेमके काय झाले या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आहे.
दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयितांविरोधात भादवि ४०८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.