बिटूमनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो त्याच्यासमोर असलेल्या प्रार्थनाच्या मृतदेहाच्या कपाळावर कुंकू लावताना दिसत आहे. यानंतर बिटूमननं पांढऱ्या फुलांचा हार प्रार्थनाच्या गळ्यात घातला. त्यानंतर पांढऱ्या फुलांचा दुसरा हार प्रार्थनाला स्पर्शून स्वत:च्या गळ्यात घातला. लग्नात वधू वर एकमेकांना हार घालतात, त्याचप्रमाणे बिटूमननं हार घातला आणि घालून घेतला.
बिटूपन आणि प्रार्थना यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमाची कल्पना होती. बिटूपनच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ‘काही दिवसांपूर्वी प्रार्थना आजारी पडली. तिला गुवाहाटीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आम्ही तिला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले,’ असं प्रार्थनाचा नातेवाईक असलेल्या शुभम बोरा यांनी सांगितलं.
प्रार्थनाच्या निधनाचा बिटूपनला धक्का बसला. तो लग्नासाठी आवश्यक साधनसामग्री घेऊन पोहोचला. ‘प्रार्थनाला अखेरचा निरोप देण्यासाठी बिटूपन आमच्या घरी आला. मी आज प्रार्थनाशी लग्न करणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. आम्ही काहीच बोललो नाही. कारण हे आमच्या कल्पनेपलीकडचं होतं. कोणीतरी माझ्या बहिणीवर इतकं प्रेम करत होतं. तिच्या मृत्यूनंतरही ते प्रेम तसूभरही कमी झालेलं नव्हतं हे पाहून आम्ही सगळेच गहिवरलो. एका अनोख्या आणि अमर प्रेमाचे आम्ही साक्षीदार ठरलो,’ अशा शब्दांत प्रार्थनाचा चुलत भाऊ सुभॉननं त्याच्या भावना व्यक्त केल्या.