म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत पुन्हा हत्याकांडाचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्ननिर्माण निर्माण झाले आहे. अजनीतील तरुणीच्या हत्येची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी मानकापूरमधील क्रीडा संकूलसमोर दगडाने ठेचून ३५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. चिंगारू हे मृतकाचे नाव आहे. तो कचरा वेचायचा.

क्रीडा संकुलच्या भिंतीलगत शनिवारी सकाळी एका नागरिकाला युवकाचा मृतदेह दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. दगडाने डोके ठेचून युवकाचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलच्या शवागाराकडे रवाना केला. मानकापूर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुनहा दाखल करून तपास सुरू केला आहे.

४८ तासांत चार खून

उपराजधानीत १५ दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर गत ४८ तासांत चार खुनाच्या घटना घडल्याने गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गुरुवारी दुपारी सक्करदऱ्यातील भांडे प्लॉट येथे कौटुंबीक कलहातून सोनू शेख याने नऊ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री गिट्टीखदानमधील पंचशिलनगर येथे सचिन अलोणे या गुन्हेगाराची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी अजनीतील अभयनगर येथे प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. तर मानकापूरमध्ये शनिवारी सकाळी दगडाने ठेचून युवकाची हत्या करण्यात आली.

लग्नाची गळ घातल्याने मारले

लग्नाची गळ घातल्याने युवकाने प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे. सोनू ऊर्फ प्रेम पंकज गणवीर (वय २६, रा. रहाटेनगर झोपडपट्टी) हे अटकेतील तर आरती भलावी (वय २५, रा.शताब्दीनगर) हे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तो ऑटोचालक आहे. गत सहा वर्षांपासून त्याचे आरतीसोबत प्रेमसंबंध होते. आरती ही त्याला लग्नासाठी गळ घालत होती. तो लग्नाला नकार द्यायचा. शुक्रवारी सकाळी त्याने आरतीला अभयनगरमधील झंझाळ ले-आऊट येथील एका निर्माणाधीन घरात भेटायला बोलाविले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. सोनू याने गळा आवळून आरतीचा खून केला व पसार झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस व गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक निरीक्षक किरण चौगुले, दिलीप चंदन, सहाय्यक उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोनू याला पकडून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले. अजनी पोलिसांनी सोनू याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here