शिंदे म्हणाले, ‘राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आहे. चार महिन्यांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांना मदत केली. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना भेटत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्यातील मुख्यमंत्री वाटत आहे; तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता एक चळवळ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. करोनाकाळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केले.’
‘होणारे काम तत्काळ मार्गी लावतो’
‘राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या चार महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मनात अढी न ठेवता मी काम करतो. आजपर्यंतच्या प्रवासात जे भेटले, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जे भेटले नाही, ते भविष्यात भेटतील. बघतो, करतो, सांगतो, असा आपला स्वभाव नाही. जे काम होणार आहे, ते तत्काळ मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असतो. त्यामुळेच बदला घेण्याऐवजी बदल घडविण्याचा जे विचार करतात, तेच उंची गाठतात,’ असे एकनाश शिंदे म्हणाले.
‘वैद्यकीय सहायता निधीत वाढ’
राज्यातील गोरगरीब नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत करण्यात येते. मात्र, यापूर्वी ही मदत अवघी २५ हजार रुपये होती. विविध गंभीर शस्त्रक्रियांसाठी ही रक्कम कमी होती. यात वाढ करून तीन लाख रुपये करण्यात आले आहेत. या मदत निधीचा अनेकांला लाभ होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी सांगितले.