मुंबई : शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यावरींवर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात महाराष्ट्र भाजपही सहभागी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमान केल्यावरून काँग्रेससह गांधी घराण्याला गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत असल्याचं म्हणत आहेत. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यापालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवं, हे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचं वैयक्तिक मत आहे, असा टोला शिवसेनेने राज्यापलांसह भाजपला लगावला आहे. एवढचं नव्हे तर शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केल्याने भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावरून सामनातून समाचार घेण्यात आला. ‘राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात भाजप आणि मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला. त्यातले काही वळू रस्त्यावर उतरल. ‘शिवसेना आता काय करणार?’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे’, असं म्हणत शिवसेने टोला लगावला आहे.