‘राज्याच्या पश्चिम व उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पुढील दोन-तीन दिवसांपर्यंत पुण्याचे हवामान ढगाळ राहणार आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊन पुणेकरांची थंडीपासून सुटका होऊ शकते. बुधवारनंतर ही परिस्थिती तयार होईल, असा अंदाज आहे,’ असे पुणे वेधशाळेच्या पर्जन्यमापन विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले.
ढगाळ वातावरणाचा अंदाज
राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस अंशत: ढगाळ वातावरण जाणवेल. त्या वेळी पारा आणखी दोन अंशांनी घसरण्याचा भारतीय वेधशाळेचा अंदाज आहे.
मुंबईत गारठा वाढला…
मुंबईमध्येही किमान तापमान २० अंशांच्या खाली नोंदले गेले असून, राज्यात पुढील १० ते १२ दिवस थंडीचे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यात २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत किंचित तापमान वाढही होऊ शकते. सध्या ईशान्य दिशेकडून वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असल्याने तापमानात घट आहे.
राज्यात रविवारी जळगाव येथे ८.५, नाशिक येथे ९.८, औरंगाबाद येथे ९.२, पुणे येथे ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जळगावचा पारा २४ तासांमध्ये ४.५ अंशांनी खाली उतरला. महाबळेश्वर येथे १०.६, सातारा येथे १२.६, उदगीर येथे १०.८, परभणी येथे ११.५, यवतमाळ येथे १०, गोंदिया येथे १०.४, नागपूर येथे ११.४, अमरावती येथे ११.७ किमान तापमान नोंदले गेले. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्या माध्यमातून विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी शीतलहरीचा स्थानिकांना अनुभव येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात यवतमाळ ‘कूल’
नोव्हेंबरच्या पंधरवड्यानंतर विदर्भात थंडी पडू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात अचानक घसरण झाली. रविवारी यवतमाळात १० अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. हे विदर्भातील सर्वांत कमी तापमान होते. त्याखालोखाल गोंदियात १०.४ आणि नागपुरात ११.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हा या मोसमातील नीचांक आहे. यवतमाळ आणि गोंदियात थंडीची सौम्य लाट घोषित करण्यात आली आहे.
नाशिकमध्येही शीतलहर
नाशिकमध्ये रविवारी ९.८ आणि जळगावात ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकसह जळगावमध्येही यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान नोंदविले गेले. जळगाव सर्वांत ‘कूल’ ठरले असून, येत्या काही दिवसांत शीतलहरींचा प्रभाव आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या किमान तापमानात घट झाली. उत्तरेकडील राज्यांतून शीतलहरींचा दक्षिणेकडील प्रवास सुरू झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे.
उर्वरित महाराष्ट्रासाठी तापमानासंदर्भात कोणताही इशारा नाही. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्येही १० ते १२ अंशांदरम्यान तसेच काही ठिकाणी १४ ते १६ अंशांदरम्यानही किमान तापमानाची नोंद होऊ शकते. २७ नोव्हेंबरपासून थंडीच्या मोसमातील तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
कोकण विभागात पुढील दोन दिवसांत कमाल तापमान अर्ध्या अंशाने खालावण्याची शक्यता आहे. हे तापमान ३३ ते ३३.५ अंशांदरम्यान असू शकेल. उर्वरित महाराष्ट्रात २८ ते २९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होऊ शकते. त्यामुळे दिवसाचे तापमानाही थंडीसाठी पूरक राहील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतही रविवारी कुलाबा येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा १.८ तर सांताक्रूझ येथे १.६ ने कमी होते. कुलाबा येथे ३१.६ आणि सांताक्रूझ येथे ३२.१ नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर शनिवारच्या तुलनेत एका अंशांची घसरण झाली आहे.