मुंबई: मुंबईतील मालवणी परिसरात भयानक हत्याकांड घडलं आहे. शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकानं १३ वर्षांच्या मुलाचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या केली. मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी या मुलाचा मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली.

मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी एका १३ वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या हत्येचा छडा पोलिसांनी लावला असून, शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. लॉकेट, कपडे आणि चपलांवरून मृतदेहाची ओळख पटली आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. विद्यानंद यादव (वय १३, राहणार, आरे कॉलनी) असं मृताचं नाव आहे. आरोपी करण बहादूर (वय २३) हा शेजारीच राहतो. तो रिक्षाचालक आहे. यादव कुटुंबीय आणि बहादूर याचं छोटीशी भिंत बांधण्यावरून वाद झाला होता. यातून हे हत्याकांड घडलं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

बहादूर यानं विद्यानंद याला रिक्षा चालवायला शिकवतो असं सांगून मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी नेलं. तिथं त्याचा धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितलं की, मालवणीतील जोगई वाडी रस्त्यालगतच्या परिसरात एका मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस घटनास्थळी तातडीनं पोहोचले. मृतदेह कुजलेला असल्यानं ओळख पटवणे कठीण झालं होतं. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जवळील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला.

मुलाच्या शरीरावर एक लॉकेट सापडलं. तसंच कपडे आणि चपलांवरून मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास मदत झाली. अशाच वर्णनाचा एक १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आरे पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर आम्ही कुटुंबीयांशी संपर्क साधला. ते रुग्णालयात आले. त्यांनी मुलाची ओळख पटवली, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शेजारी राहणाऱ्या करण बहादूर याच्यासोबत किरकोळ भांडण झालं होतं, असं त्यांनी सांगितलं. शुक्रवारीच बहादूरला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली. या प्रकरणी बहादूरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here